
Jasprit Bumrah Injury: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर आराम करत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. दुखापतीमुळे बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळू शकला नाही. त्याच वेळी, आता असे वृत्त येत आहे की बुमराह आयपीएल 2025 च्या काही सामन्यांनाही मुकू शकतो. आता न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू शेन बाँडने (Shane Bond) जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीबाबत मोठे विधान केले आहे.
बुमराहची कारकीर्द धोक्यात
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचा राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांनी जसप्रीत बुमराहबद्दल म्हटले की, “तो सर्वोत्तम गोलंदाज आहे, परंतु जर त्याला त्याच जागी पुन्हा दुखापत झाली तर त्याची कारकिर्द संपुष्टात येऊ शकते. कारण मला खात्री नाही की पुन्हा त्या जागी शस्त्रक्रिया करू शकाल."
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान दुखापत
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. ज्यामुळे बुमराहला गोलंदाजीही करता आली नाही. खरंतर, सामन्यादरम्यान बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास झाला आणि सामन्याच्या मध्यभागी त्याला स्कॅन करावे लागले. ज्यामुळे त्याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडावे लागले सध्या, बुमराह बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे.
पाठीची शस्त्रक्रिया
याआधीही बुमराह पाठीच्या दुखापतीशी झुंजत असल्याचे दिसून आले. ज्यामुळे जसप्रीत बुमराहने मार्च 2023 मध्ये पाठीची शस्त्रक्रिया देखील केली. शस्त्रक्रियेनंतर बुमराहला पहिल्यांदाच पाठीचा त्रास झाला आहे. आता बुमराह क्रिकेटच्या मैदानावर कधी परतणार हे पहावे लागेल.