IPL 2022, RCB vs KKR Match 6: आयपीएलच्या (IPL) 6 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) दिलेल्या 129 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Roya Challengers Bangalore) 19.2 षटकांत 7 विकेट गमावून विजय मिळवला आणि या स्पर्धेत आपल्या विजयाचं बिगुल वाजवलं. यापूर्वी पहिल्या सामन्यात दोनशे धावा करूनही आरसीबीला पराभव पत्करावा लागला होता. आरसीबीच्या (RCB) विजयात वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने बॉल तर शेरफेन रदरफोर्ड आणि शाहबाज अहमद यांनी बॅटने महत्वाची भूमिका बजावली. हसरंगा याने 20 धावा देऊन चार विकेट घेतल्या. तर बेंगलोरकडून रदरफोर्डने 28, अहमदने 27 आणि डेविड विलीने 18 धावा केल्या. दुसरीकडे, केकेआर फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांनी मोर्चा सांभाळला आणि संघाला सलग दुसरा विजय मिळवून देण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले पण अपयशी ठरले. (IPL 2022: माजी RCB दिग्गज AB de Villiers याची मोठी भविष्यवाणी, सांगितले या मोसमात विराट कोहली किती धावा करणार?)
कोलकात्याकडून मिळालेल्या 129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवातही योग्य राहिली नाही आणि संघाने 17 धावांतच आपले तीन विकेट गमावल्या. अनुज रावत खातेही उघडू शकला नाही. तर कर्णधार फाफ डू प्लेसिस 5 आणि विराट कोहली अवघ्या 12 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतले. केकेआर गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक दणके दिल्यावर डेविड विली आणि रदरफोर्ड यांनी डाव सावरला व संघाला विजयच्या जवळ नेले. यादरम्यान सुनील नारायण याने विली याला 18 धावांवर माघारी धाडलं. तसेच शाहबाझ नदीम देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 27 धावांवर बाद झाला. रदरफोर्ड देखील मोक्याच्या क्षणी बाद झाला. पण दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी मिळून अखेरच्या षटकांत संघाला विजयीरेष ओलांडून दिली. टिम साउदीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. याशिवाय उमेश यादव तीन तर सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
यापूर्वी बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कोलकाताची फलंदाजी अत्यंत निराशाजनक ठरली आणि संघ 18.5 षटकांत 128 धावांत गारद झाला. आपला 400 वा T20 सामना खेळताना आंद्रे रसेल याने कोलकातासाठी सर्वाधिक 25 धावा केल्या. त्याच्याशिवाय उमेश यादव याने 12 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 18 धावा केल्या. दुसरीकडे, बेंगलोरसाठी हसरंगा हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, ज्याने 4 षटकात 20 धावा देत 4 बळी घेतले. तसेच आकाश दीपने तीन आणि हर्षल पटेलने दोन तर मोहम्मद सिराजने एक गडी बाद केला.