IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जला विजयाचे ‘पंचक’ करायचे असल्यास ‘या’ 5 धुरंधर खेळाडूंवर असणार संघाची मदार
चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022: एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभव करून इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) आपले चौथे विजेतेपद पटकावले होते. आणि यावेळी पुन्हा एकदा धोनी CSK चे नेतृत्व करणार आहे आणि त्याचे लक्ष पाचवे जेतेपद जिंकण्यावर असेल. फक्त मुंबई इंडियन्सने चेन्नईपेक्षा जास्त आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत. मुंबई 5 वेळा आयपीएल  (IPL) विजेता आहे. अशा परिस्थितीत चेन्नईला मुंबईशी बरोबरी साधायची असेल तर कर्णधार एमएस धोनीसह 5 क्रिकेटपटूंवर संघाची मदार असेल. दरम्यान सर्व खेळाडूंच्या कामगिरीवर CSK चे भवितव्य अवलंबून आहे. तथापि खालील पाच खेळाडूंच्या कामगिरीवर संघ अधिक अवलंबून असेल. धोनीशिवाय आणखी 4 खेळाडूंना 2021 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. (IPL 2022 मध्ये ‘हे’ 5 खेळाडू ठरवणार मुंबई इंडियन्सचे भवितव्य, यावेळी नवीन रूप-रंगात दिसणार संघ)

1. एमएस धोनी

चेन्नईला 4 वेळा चॅम्पियन बनवण्यात कर्णधार एमएस धोनी याने निर्णायक भूमिका राहिलेली आहे. अशा परिस्थितीत धोनीला बॅटनेच नाही तर कर्णधार म्हणून त्याला नक्कीच पुढाकाराने खेळावे लागेल आणि आयपीएल 2022 मध्ये त्याने संघासाठी फिनिशरची भूमिका बजावणे गरजेचे आहे.

2. ऋतुराज गायकवाड

आयपीएल लिलावापूर्वी फ्रँचायझीने काय ठेवून ऋतुराज याच्यावर मोठा विश्वास दर्शवला आहे. आणि या वेळी त्याला त्या भरवशाची परतफेड करण्याची संधी आहे. ऋतुराजने गेल्या वर्षी सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप पटकावली होती, आणि संघाच्या जेतेपदाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. सलामीवीर म्हणून ऋतुराजवर या वेळी अधिक जबाबदारी असेल कारण आता संघाकडे फाफ डु प्लेसिस नाही आहे. अशा स्थितीत गायकवाडसह रॉबिन उथप्पा डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.

3. मोईन अली

चेन्नईने रिटेन केलेला मोईन अली एकमेव परदेशी खेळाडू आहे. 2021 मध्ये एमएस धोनीने मोईन याला आघाडीवर फलंदाजीला पाठवले आणि त्याने देखील संघाला निराश न करता चांगले परिणाम मिळवून दिले. अशा परिस्थितीत मोईनने पुन्हा एकदा फलंदाजी क्रमवारीत आघाडीवर योगदान द्यावे आणि नंतर मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करून संघासाठी विकेट घेणे अपेक्षा असेल.

4. रवींद्र जडेजा

चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने आयपीएल 2022 च्या महा लिलावापूर्वी उर्वरित 3 खेळाडूंसह रवींद्र जडेजाला कायम ठेवले होते. जडेजा चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू असून त्याला फ्रँचायझीने 16 कोटींमध्ये रिटेन केले. अशा स्थितीत त्याच्याकडून गेल्या हंगामाप्रमाणेच चेंडूसह बॅटनेही फटकेबाजी करणे अपेक्षित असेल.

5. दीपक चाहर

दीपक चाहर याला गेल्या महिन्यात दुखापत झाली ज्यामुळे CSK ची चिंता वाढली आहे आणि त्यामुळे तो किमान सुरुवातीला आयपीएल खेळण्याची शक्यता नाही परंतु सर्वांना माहित आहे की तो चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजी लाइनअपचा अविभाज्य भाग आहे. सीएसकेची गोलंदाजी त्याच्याभोवती फिरताना दिसते त्यामुळे तो दुखापतीतून सावरल्यास चेन्नईचा सर्वात मोठा प्रश्न सुटणार आहे.