IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, 9 गडी राखून पंजाबला दिला धोबीपछाड; गोलंदाजांनंतर शॉ-वॉर्नर यांनी उडवली दाणादाण
पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs PBKS: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) दणदणीत विजय मिळवला आणि पंजाब किंग्सचा (Punjab Kings) 9 गडी राखून धोबीपछाड दिला. दिल्लीने पहिले शानदार गोलंदाजीच्या बळावर पंजाबला अवघ्या 115 धावसंख्येवर रोखलं. त्यांनतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि डेविड वॉर्नर  (David Warner) यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर फक्त 10.3 षटकांत विजय मिळवला आणि गेल्या सामन्यात पराभवानंतर आपली गाडी रुळावर आणली. दिल्लीचा सहा सामन्यातील हा तिसरा विजय ठरला आहे. तर पंजाबचा सात सामन्यातील चौथा पराभव ठरला आहे. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीकडून वॉर्नरने सर्वाधिक नाबाद 60 धावा केल्या. तर पृथ्वी शॉने 41 धावांची खेळी केली आणि सरफराज खान 12 धावा करून नाबाद राहिला. दुसरीकडे, फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजही फारसे प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. पंजाबसाठी राहुल चाहरने एकमात्र विकेट घेतली. (IPL 2022: कोरोनाचे साईड-इफेक्ट्स! 22 एप्रिल रोजी पुणेच्या MCA ऐवजी आता वानखेडे स्टेडियमवर रंगणार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना)

नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या पंजाबची सुरुवात चांगली झाली. मात्र मयंक अग्रवाल आणि शिखर धवन या दोन्ही सलामीवीरांच्या लागोपाठ षटकांत विकेट्स गमावल्याने संघ पूर्णपणे हतबल झाला. धवन 9, तर मयंकमी 24 धावा केल्या. यानंतर लियाम लिविंगस्टोन 2 आणि जॉनी बेअरस्टो 9 धावा करून परतले. जितेश शर्माने सुरुवातीच्या विकेट पडल्यावर संयमाने फलंदाजी करून 23 चेंडूत 32 धावांची खेळी केली. शर्माला वगळता पंजाबचे अन्य फलंदाज दिल्लीच्या भेदक गोलंदाजी हल्ल्यापुढे तग धरून खेळू शकले नाही. पंजाबने दिलेल्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना पृथ्वी आणि वॉर्नरच्या सलामी जोडीने पुन्हा एकदा जबरदस्त सुरुवात केली. दोंघांनी पंजाबच्या गोलंदाजांना धारेवर धरलं आणि हल्ला बोल सुरु केला. वॉर्नर आणि शॉ यांच्यात पहिल्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी झाली.

खलील अहमद, ललित यादव, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. दिल्लीने लक्ष्याचा दणदणीत पाठलाग केला. पृथ्वीने 20 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 40 धावा करून राहुल चाहरच्या चेंडूवर बाद झाला. तर वॉर्नरने धमाकेदार खेळ सुरूच ठेवला आणि 26 चेंडूंत नऊ चौकार व एका षटकार मारून मोसमातील आपले सलग तिसरे अर्धशतक पूर्ण केले. वॉर्नर 30 चेंडूत नाबाद 60 धावा करून संघाच्या विजयाचा नायक ठरला.