IPL 2022 Auction: आता नाही तर कधीच नाही! यावेळी नाही मिळाला खरेदीदार तर ‘या’ आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंचा होऊ शकतो खेळ खल्लास!
आयपीएल लिलाव 2021 (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात बेंगलोर येथे आयोजित केला जाणार आहे. आयपीएल लिलावाच्या (IPL Auction) तारखेची अद्याप पुष्टी झाली नसली तरी यामध्ये अनेक खेळाडूंचे भवितव्य ठरेल. आयपीएलच्या (IPL) लिलावापूर्वी फ्रँचायझींनी अनेक मोठ्या खेळाडूंना रिलीज केले आहे तर दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा खेळाडूही लिलावात उतरणार आहेत. अशा परिस्थतीत या खेळाडूंच्या विक्रीवर चाहत्यांची बारीक नजर असणार आहे. दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, शिखर धवन, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रँचायझींनी रिलीज केले ज्यामुळे आता ते लिलावात उतरणार आहेत. आज आपण अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना यंदा खरेदीदार मिळाला नाही तर स्पर्धेत त्यांचा खेळ खल्लास संपुष्टात येऊ शकतो. (IPL 2022: विराट कोहलीनंतर मनीष पांडे बनणार RCB चा कर्णधार? या 3 कारणांमुळे बेंगलोर फ्रँचायझी करू शकते मोठा फेरबदल)

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)

दोन वेळा आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकला संघातून सिलीज केले, ज्यानंतर आता विकेटकीपर-फलंदाज लिलावाच्या पूलमध्ये दिसणार आहे. कार्तिकने आयपीएल 2021 मध्ये 17 सामन्यांमध्ये 22.30 च्या सरासरीने आणि 131.17 च्या स्ट्राइक रेटने 223 धावा केल्या. कार्तिक अनेक वर्षापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात त्याची विक्री झाली नाही तर त्याची क्रिकेट कारकीर्द कायमची संपुष्टात येऊ शकते.

सुरेश रैना (Suresh Raina)

आयपीएल 2020 च्या सुरुवातीपूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडणारा रैना यंदाच्या स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानावर परतला. चेन्नई सुपर किंग्ससाठी रैना यंदा 12 सामन्यात फक्त 160 धावाच करू शकला. रैना बॅटने लयीत नसल्यामुळे त्याला फायनलसह उर्वरित सामन्यातून बाहेर करण्यात आले. गेल्या वर्षी रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती देखील जाहीर केली. तसेच रैना अधिक देशांतर्गत क्रिकेट खेळत नसल्यामुळे त्याला आयपीएलच्या लिलावात खरेदीदार मिळण्याची संधी देखील कमी आहे. अशा स्थितीत यंदा रैनाला कोणत्याही फ्रँचायझीने खरेदी केले नाही तर त्याचा आयपीएल प्रवासही संपुष्टात येऊ शकतो.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

टीम इंडियाचा तडाखेबाज अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. त्याने गेल्या हंगामात 12 सामन्यात फक्त 127 धावा केल्या. त्याच्या याच निराशाजनक खेळीमुळे मुंबई इंडियन्सने त्याला आगामी लिलावापूर्वी रिलीज केले. याशिवाय हार्दिक सध्या गोलंदाजी करण्यात असमर्थ असल्यामुळे लिलावात कोणताही खरेदीदार त्याच्यावर बोली लावण्यापूर्वी नक्कीच गहन विचार करेल. यामुळे भारतीय संघातील जागेनंतर आयपीएलचे दार देखील त्याच्यासाठी बंद होऊ शकतात.