IPL 2021: ड्वेन ब्रावोचा सर्वात मोठा आयपीएल विक्रम मोडण्याच्या Harshal Patel उंबरठ्यावर, इतिहास घडवण्यापासून फक्त 7 विकेट दूर
हर्षल पटेल (Photo Credit: PTI)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्याचा आनंद घेत आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये त्याने आतापर्यंत 11 सामन्यांत 26 विकेट्स घेतल्या आहेत आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. हर्षलनंतर 18 विकेट घेऊन दिल्लीचा आवेश खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. सद्य परिस्थिती पाहता, यंदा हंगामात पर्पल कॅप हर्षल पटेलकडे राहील असे दिसत आहे. यासह हर्षल एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनू शकतो. त्याने केवळ 11 सामन्यांमध्ये लेगस्पिनर युजवेंद्र चहलचा विक्रम मोडला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) आयपीएलच्या (IPL) इतिहासातील एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 2013 मध्ये 32 विकेट्स घेतल्या होत्या. अशा स्थितीत हर्षल पटेल त्याच्यापेक्षा यंदाच्या हंगामात जास्त विकेट घेऊ शकतो. (IPL 2021 Purple Cap Updated: पर्पल कॅपच्या यादीत Harshal Patel चा जलवा कायम, पहा टॉप-5 गोलंदाजांची यादी)

हर्षल 2013 मध्ये 32 विकेट घेण्याचा ब्रावोचा विक्रम सहज मोडू शकतो. त्याने 11 सामन्यांत आतापर्यंत 26 विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याचा संघ अजून तीन लीग सामने खेळणार आहेत. याशिवाय, आरसीबीच्या प्लेऑफ स्थान देखील जवळपास निश्चित आहे. अशा स्थितीत हर्षल पटेलकडे ब्रावोचा विक्रम मोडण्यासाठी किमान चार सामने आहेत. तसेच ब्रावोचा विक्रम मोडण्यापासून तो फक्त सात विकेट्स दूर आहे. हर्षलने यंदाच्या मोसमात प्रत्येक दोन सामन्यांत पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्यानुसार तो या चार सामन्यांमध्ये 10 विकेट घेऊ शकतो. असे झाल्यास हर्षल आयपीएलच्या इतिहासात 36 विकेट घेऊन एक नवीन विक्रम निर्माण करेल आणि एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल. दरम्यान, हर्षल पटेलने आयपीएलच्या या मोसमात हॅटट्रिकसह एकूण 26 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने एका सामन्यात दोन वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम देखील केला आहे. हर्षल पाठोपाठ दिल्लीच्या आवेश खानने 18 विकेट, मुंबईच्या जसप्रीत बुमराहने 16 विकेट, पंजाबच्या मोहम्मद शमीने आणि दिल्लीच्या क्रिस मॉरिसने प्रत्येकी 14 विकेट घेतल्या आहेत.

दुसरीकडे, पटेलने या मोसमात 24 वी विकेट घेऊन आरसीबी साथीदार चहलचा 2015 चा विक्रम मोडला. आता हर्षल आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा अनकॅप्ड गोलंदाज बनला आहे. यापूर्वी, चहलने 2015 मध्ये 23 विकेट्स घेतल्या होत्या, जेव्हा तो भारतीय संघासाठी कोणताही सामना खेळला नव्हता. पटेलला अजून टीम इंडियाकडून बुलावा आलेला नाही आहे आणि त्याने 26 विकेट घेत चहलचा विक्रम मोडला आहे. मात्र, या कामगिरीच्या आधारावर त्याला लवकरच भारतीय संघात समाविष्ट केले जाऊ शकते याची शक्यता अधिक दिसत आहे.