भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या (IPL 2021) चौदाव्या हंगामावर सध्या कोरोनाचे (Coronavirus) सावट गडद होत चालले आहे. आयपीएल 2021 स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (KKR Vs RCB) यांच्यात सामना रंगणार होता. मात्र, या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. यातच चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) 3 सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु, चेन्नईच्या या सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे माहिती मिळत आहे.

कोलकाताचे 2 क्रिकेटपटू वरून चक्रवर्ती आणि संदिप वॉरिअर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ज्यामुळे कोलकाता आणि बेंगलोर यांच्यात आज खेळण्यात येणारा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक एल बालाजी आणि निम्न स्तरावरील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, ही संपूर्ण माहिती खोटी असल्याचे सांगितले जात आहे. या तिघांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- IPL 2021 Points Table Updated: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा CSK ला बसला झटका, ‘सुपर संडे’नंतर पहा आयपीएलची गुणतालिका

आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात काही खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ज्यात अक्षर पटेल आणि देवदत्त पद्धिकल सारख्या खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेच्या मध्यभागी खेळाडू किंवा सहाय्यक कर्मचार्‍यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येण्याची ही पहिली घटना आहे. आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. अशात खेळाडूंना करोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.