IPL 2020 Update: दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे आयपीएलसाठी ECBला मिळाली परवानगी, क्वारंटाइन न होता टीम खेळू शकणार सामने
रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 13 वा सत्र सुरू होण्यास आता फारच कमी वेळ शिल्लक आहे. दुसरीकडे, अमीरात क्रिकेट बोर्डाला (Emirates Cricket Board) आयपीएल 2020 साठी सरकारची मंजुरी मिळाली आहे. आयपीएल दरम्यान काटेकोरपणे कसे नियम पाळले जाईल आणि खेळाडूंना मानक ऑपरेटिंग प्रक्रिया म्हणजेच SOP कसा पाळावा लागेल या संदर्भात ईसीबीने (ECB) एक निवेदन जारी केले आहे. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने म्हटले की, “दुबई, अबु धाबी आणि शारजा अशा तीन ठिकाणी आयपीएल आयोजित करण्यासाठी आम्हाला आवश्यक त्या परवानगी मिळवल्या आहेत. स्टेडियमशी संबंधित असलेले स्थानिक प्रशासन या संबंधीचे नियम आणि प्रोटोकॉल तयार करणार आहे. त्यामुळे खेळाडूंना प्रत्येक वेळी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर क्वारंटाइन न होता थेट खेळाच्या ठिकाणी ते हॉटेलमध्ये येणे-जाणे सुकर होणार आहे.” (IPL 2020 पूर्वी विराट कोहलीचे जैव-सुरक्षित बबलचा पालन करण्याचे आवाहन, म्हणाला-'दुबईला क्रिकेट खेळण्यासाठी आलो, मजा करण्यासाठी नाही')

आयपीएल 2020 चा पहिला सामना 19 सप्टेंबरला तर अंतिम सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. अमिराती बोर्डाने पुढे स्पष्ट केले की, “प्रवासांदरम्यान सर्व संघ बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार जैव-सुरक्षित बबलमध्ये राहतील. परदेशातून किंवा जैव-सुरक्षित बबलच्या बाहेरून येणाऱ्यांना स्पर्धेसाठी दाखल झाल्यावर क्वारंटाइन व्हावं लागणार, पण जे बबलमध्ये आहेत त्यांना सामन्यांसाठी प्रवासाबद्दल चिंता करण्याची गरज नाही.” ईसीबीला सर्व प्रकारची परवानगी मिळाल्यानंतर आता बीसीसीआय आयपीएल 13 व्या सत्राचे वेळापत्रक काही दिवसांत जाहीर करू शकेल.

आयपीएलचे सर्व संघ युएईमध्ये पोहोचले आहेत. दुबई, शारजाह आणि अबूधाबी येथे संघ सराव करीत आहेत. चेन्नई सुपर किंग्स वगळता सर्व संघांनी सराव सुरु केला आहे. दोन सीएसके खेळाडू आणि काही सहाय्यक कर्मचारी सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. मात्र अन्य सात संघांनी सराव सुरू केला आहे. शिवाय, बीसीसीआय सुरुवातीच्या एका आठवड्यापर्यंत सीएसकेला सामना न देण्याचा नवीन वेळापत्रकात विचार करू शकते. सोमवारी सीएसके टीमची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, ज्यात सर्वांचा अहवाल नकारात्मक आला. आणि आता 3 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा त्यांची कोविड टेस्ट केली जाईल ज्याचा अहवाल नकारात्मक आल्यावर ते मैदानी प्रशिक्षण सुरु करू शकतील.