SRH vs RCB, IPL 2020 Eliminator: SRHचा विजयी चौकार! 6 विकेटने विजय मिळवत क्वालिफायर-2 मध्ये मिळवला प्रवेश, RCBच्या प्रवासाला लागला ब्रेक
केन विल्यमसन आणि जेसन होल्डर (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2020 Eliminator: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यातील आयपीएलच्या एलिमिनेटर (IPL Eliminator) सामन्यात डेविड वॉर्नरच्या टीमने 6 विकेटने थरारक विजय मिळवला आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान निश्चित केलं. हैदराबादचा हा सलग चौथा विजय ठरला. आरसीबीने (RCB) दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादसाठी केन विल्यमसन (Kane Williamson) आणि जेसन होल्डर (Jason Holder) यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. विलियम्सन नाबाद आणि होल्डरने नाबाद 24 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. या दोन्ही खेळाडूंऐवजी मनीष पांडेने 24 आणि कर्णधार डेविड वॉर्नरने 17 धावा केल्या. दुसरीकडे, आजच्या सामन्यातील पराभवानंतर आरसीबीचे स्पर्धेतून पॅकअप झाले. आरसीबीसाठी फलंदाजांनंतर गोलंदाजांनी निराशा केली. आरसीबी गोलंदाज मोक्याच्या क्षणी विल्यमसन आणि होल्डरची भागीदारी मोडण्यात अपयशी ठरले ज्याचा फटका संघाला बसला. मोहम्मद सिराजने 2 तर अ‍ॅडम झांपा आणि युजवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IPL 2020: आयपीएलमध्ये पहिल्यांदाच घडले असे, मोईन अली Free Hit वर रनआऊट होणार ठरला पहिला क्रिकेटर)

आरसीबीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादसाठी कर्णधार डेविड वॉर्नर आणि श्रीवत्स गोस्वामी यांनी डावाची सुरुवात केली. रिद्धिमान साहाच्या जागी खेळणारा गोस्वामी काही खास कामगिरी करू शकला नाही आणि सिराजने ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर डिव्हिलिअर्सने त्याचा झेल पकडला. त्यानंतर खेळपट्टीवर स्थिरावलेला हैदराबादचा कर्णधार वॉर्नरला देखी सिराजने झेलबाद करून माघारी धाडलं. त्याने 3 चौकारांसह 17 धावा केल्या. झांपाच्या गोलंदाजीवर मनिष पांडे 24 धावा काढून झेलबाद झाला. युवा फलंदाज प्रियम गर्ग चहलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. त्याने 7 धावा केल्या. अखेर विल्यमसन आणि होल्डरने संघाचा विजय निश्चित केला. यासह हैदराबादने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला असून तिथे त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल.

यापूर्वी, सनरायझर्स गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे आरसीबी संघ फक्त 131 धावांपर्यंत मजल मारु शकला. डिव्हिलियर्सला वगळता रॉयल चॅलेंजर्सचा एकही फलंदाज हैदराबादच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. डिव्हिलियर्सने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. हैदराबादकडून होल्डरने 3, नटराजनने 2 तर शाहबाज नदीमला 1 विकेट मिळाली.