IPL 2020: CSKला धक्का! अंबाती रायुडू अजून एका सामन्याला मुकणार, फलंदाजाच्या दुखापतीवर सीईओ कासी विश्वनाथन यांनी दिला अपडेट
अंबाती रायडू (Photo Credit: Getty)

राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) धक्कादायक पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) आणखी एक मोठा फटका बसला. अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूला (Ambati Rayudu) फ्रँचायझीसाठी पुढील दोन आयपीएल सामन्यातून बाहेर बसावे लागणार आहे. गेल्या शनिवारी अबू धाबीमध्ये (Abu Dhabi) गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुध्द रायडूने विजयी कामगिरी करून सीएसकेला (CSK) विजयी सुरुवात करून दिली होती. त्याने 71 धावा केल्या आणि फाफ डु प्लेसिससोबत तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. मात्र, शारजाह येथे मंगळवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यातून त्याला बाहेर राहावे लागले आणि त्याच्या जागी रुतुराज गायकवाडला संधी देण्यात अली जो आयपीएल (IPL) पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन (Kasi Viswanathan) यांनी रायुडू दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) सीएसके सामन्याला मुकण्याची पुष्टी केली आणि त्याच्या दुखापतीवर अपडेटही दिली. (IPL 2020: SRHला झटका! मिशेल मार्श दुखापतीमुळे आयपीएल 2020 मधून बाहेर, बदली म्हणून वेस्ट इंडिजचा तगडा क्रिकेटपटू सनरायझर्स ताफ्यात दाखल)

ANIशी बोलताना सीईओ कासी विश्वनाथन म्हणाले,“काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे, परंतु तो आणखी एका सामन्याला मुकणार. पण माहित नाही, कदाचित खेळासाठी तो योग्य वेळी फिट होईल.” 25 सप्टेंबर, शुक्रवारी सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने येतील. हा सामना दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर काही दिवसांच्या ब्रेकनंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2 ऑक्टोबर रोजी टीम मैदानावर उतरेल, त्यामुळे रायुडूला फिट होण्याची पूर्ण संधी मिळेल.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सविरुद्ध मिळालेल्या 217 धावांच्या आव्हाना दरम्यान सीएसकेला रायुडूची मोठी कमतरता जाणवली. रायुडू 100 टक्के फिट नसल्याचं सांगून रुतुराजला सीएसकेकडून पदार्पणाची संधी मिळाली. दरम्यान, रायुडू आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत आणि फलंदाजासाठी सीएसकेने शुभेच्छा देत पोस्ट शेअर केली. दुसरीकडे, आयपीएल सुरु होऊन फक्त चार दिवस झाले असताना आजवर 3 फलंदाजांना दुखापत झाली आहे. रविचंद्रन अश्विन, मिशेल मार्श आणि राशिद खान सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाले. इतकंच नाही तर मार्श संपूर्ण स्पर्धेतून बाहेरही पडला आहे.