मिशेल मार्श दुखापतीमुळे आयपीएल 2020 मधून बाहेर (Photo Credit: Twitter/SunRisers)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे गेलेल्या सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) मोठा झटका बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (Royal Challengers Bangalore) पहिल्या सामन्यात गोलंदाजी दरम्यान अष्टपैलू मिशेल मार्शच्या (Mitchell Marsh) पायाला दुखापत झाली होती, ज्यामुळे आता तो संपूर्ण आयपीएलमधून (IPL) बाहेर पडला आहे. हैदराबाद फ्रँचायझीने अधिकृतरित्या ट्विटरवरून त्याला माघार घ्यावी लागणार असल्याची पुष्टी केली. आणि त्याच्या जागी वेस्ट इंडिजचा तगडा अष्टपैलू हैदराबादच्या ताफ्यात सामील झाला आहे. “मिशेल मार्श पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. तो लवकरात लवकर तंदुरूस्त होवो हीच प्रार्थना. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डरला (Jason Holder) मार्शच्या जागी बदल खेळाडू म्हणून ताफ्यात दाखल करून घेण्यात आले आहे”, असे ट्विट सनरायझर्सने केले. बेंगलोरविरुद्ध पाचवी ओव्हर टाकताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याने फिजीओच्या मदतीने उपचार घेत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला गोलंदाजी करता आली नाही. (SRH vs RCB, IPL 2020: युजवेंद्र चहल याच्या जाळ्यात सनरायजर्स हैदराबाद जायबंदी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी सलामी)

मार्शला गोलंदाजी जमत नसल्याने विजय शंकरने ओव्हरचे शिल्लक चेंडू टाकले. फलंदाजी दरम्यान देखील मार्श खेळण्यास तितकासा सक्षम नव्हता, पण हैदराबादची स्थिती 142/8 अशी असताना संघाला असलेली गरज पाहता तो दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. पण पहिल्याच चेंडूवर हवाई फटका खेळला आणि ज्यात तो झेलबाद झाला. अखेरीस मैदानाबाहेर जाताना त्याला आरसीबी खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला. दरम्यान, कोलकाताविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यात आता हैदराबाद संघात मार्शच्या जागी डॅनिअल क्रिश्चियन, मोहम्मद नबी किंवा जेसन होल्डर या तीनपैकी एकाला संघात स्थान दिलं जाऊ शकतं.

दुसरीकडे, मार्शच्या जागी टीममध्ये स्थान मिळलेल्या होल्डरने नुकत्याच संपलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) टी-20 मध्ये बार्बाडोस ट्रायडंट्सचे नेतृत्व केले आणि टीमकडून ठळक कामगिरी करणार्‍यांपैकी तो एक होता. होल्डरला क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यासाठी लवकरच युएईमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. होल्डरने 116 टी-20 सामन्यात 91 विकेट आणि 949 धावा केल्या आहेत.