इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) तिसऱ्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) 20 ओव्हरमध्ये दिलेल्या 164 धावांच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 153 धावांपर्यंत मजल मारता आली आणि ऑलआऊट झाली. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने (RCB) 10 धावांनी विजय मिळवत आयपीएलची (IPL) विजयी सुरुवात केली. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आरसीबीचा स्टार (RCB) गोलंदाज ठरला. चहलने हैदराबादक फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि 4 ओव्हरमध्ये 18 धावा देत 3 विकेट घेतल्या. नवदीप सैनी, शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 विकेट, डेल स्टेनला 1 विकेट मिळाली. हैदराबादकडून जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) अर्धशतकी डाव खेळला, पण तो टीमला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसा नव्हता. (SRH vs RCB, IPL 2020: 20-वर्षीय देवदत्त पड्डीकल, प्रियम गर्ग यांचे आयपीएल डेब्यू; जाणून घ्या भारताच्या युवा फलंदाजांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी)
हैदराबादकडून सलामीला कर्णधार डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो उतरले आहेत. दोघे सावध खेळ करत असताना दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर वॉर्नर दुर्दैवीपणे धावबाद झाला. वॉर्नर 6 धावच करू शकला वॉर्नर बाद झाल्यावर आलेल्या मनीष-बेअरस्टो यांनी 71 धावांची भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. मात्र चहलने मनीषला 34 धावांवर बाद केलं आणि टीमला मोठी विकेट मिळाली. मनीष बाद झाल्यावर हैदराबादची घसरगुंडी सुरूच राहिली. बेअरस्टोने 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं, पण चहलने 16व्या ओव्हरमध्ये बेअरस्टोला 61 धावांवर बाद केलं आणि नंतर विजय शंकरलाही माघारी धाडले. त्यानंतर हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या प्रियम गर्ग दबाव हाताळू शकला नाही आणि 12 धावांवर हिट विकेट बाद झाला. दुबेच्या गोलंदाजीवर हेल्मेटला लागलेला चेंडू स्टम्पवर आदळला. अभिषेक शर्माने 7 धावा केल्या, तर राशिद खान 6 धावांवर रनआऊट झाला. नवदीप सैनीने भुवनेश्वर कुमारला भोपळाही फोडू न देता बोल्ड करून माघारी पाठवले.
यापूर्वी, टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या आरसीबीकडून सलामी जोडी आरोन फिंच आणि युवा देवदत्त पड्डीकल यांनी सलामीला आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी बेंगलोरला चांगली सुरुवात करून दिली. आयपीएलमध्ये पहिला सामना खेळणाऱ्या युवा फलंदाज देवदत्तने पहिल्याच सामन्यात 56 धावांची खेळी केली. मात्र विजय शकंरने 12व्या ओव्हरमध्ये देवदत्तला बोल्ड केले. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये फिंचही 29 धावा करत बाद झाला. मैदानावर सर्वात खतरनाक कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांची जोडी होती. मात्र दोघांना मोठी भागीदारी करता आली नाही. युवा गोलंदाज टी नटराजनने 14 धावांवर कोहलीला माघारी पाठवले. डिव्हिलियर्सने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी केली आणि 29 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण, अर्धशतक पूर्ण करताच डिव्हिलियर्स धावबाद झाला. हैदराबादकडून विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि टी नटराजनन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.