देवदत्त पड्डीकल आणि प्रियम गर्ग (Photo Credit: Instagram)

आयपीएलच्या (IPL 2020) 13व्या हंगामातील तिसरा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. हा सामना डेविड वॉर्नरच्या (David Warner) सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात सुरु आहे. हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने तूस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या या सामन्यात दोन्ही टीमकडून प्रत्येकी एका युवा भारतीय फलंदाजाने डेब्यू केले. देवदत्त पड्डीकलने (Devdutt Padikkal) बंगलोर तर, प्रियम गर्गने (Priyam Garg) हैदराबादकडून आयपीएलमध्ये (IPL) पदार्पण केले. टप्प्याटप्प्याने त्याच्या अप्रतिम वाढीनंतर, आयपीएलच्या या लिलावापूर्वी हैदराबादने प्रियमची निवड केली. प्रियमच्या नेतृत्वात भारताने 2020 अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. दुसरीकडे, पड्डीकलने आरसीबीकडून आरोन फिंच सोबत डावाची सुरुवात केली. (SRH vs RCB, IPL 2020: डेविड वॉर्नरने टॉस जिंकत घेतला पहिले गोलंदाजीचा निर्णय, पाहा हैदराबाद आणि बेंगलोरचा Playing XI)

गेल्या एका वर्षात देवदत्तने घरगुती क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने मागील वर्षी कर्नाटकला विजय हजारे ट्रॉफी जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. देवदत्तने केवळ 11 सामन्यांत 609 धावा केल्या ज्यामध्ये दोन शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये देखील कर्नाटक फलंदाजाने आपला फॉर्म कायम ठेवला आणि 12 सामन्यात 548 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 178 च्या वर तर सरासरी 64 च्या वर होता. या स्पर्धेत त्याने शतक व पाच अर्धशतके झळकावली.

दरम्यान, प्रियम गर्गच्या नेतृत्वात भारताने अंडर-19 वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली, मात्र बांग्लादेशकडून भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रियाम गर्गने अंडर 14, अंडर 16 आणि अंडर 19 पासून सुरू होणार्‍या सर्व वयोगटातील क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे. विविध वयोगटातील क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय अंडर-19 संघात निवडले गेले आणि दक्षिण आफ्रिकेत 2020 अंडर-19 वर्ल्डकप दरम्यान संघाचे नेतृत्व करण्याचा बहुमानही त्यांना मिळाला. गर्गने 18 व्या वाढदिवसाच्या 12 दिवस अगोदर नोव्हेंबर 2018 मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्वरित गोव्याविरुद्ध पदार्पणाच्या शतकासह ठसा उमटविला.