IPL 2022: ‘या’ खेळाडूचं नशीब फिरले; भारतासाठी दोन विश्वचषक खेळला, 2014 मध्ये IPL ची पर्पल कॅप जिंकणारा खेळाडू बनला नेट बॉलर
मोहित शर्मा (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 15 वा हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरू होत आहे. दोन नवीन फ्रँचायझींसह एकूण 10 संघ यावेळी लीगमध्ये सामील होत आहेत. त्यासाठी नव्याने आणि मोठ्या प्रमाणात लिलावही आयोजित करण्यात आला. येथे युवा खेळाडूंना अधिक खरेदीदार मिळाले, तर अनेक अनुभवी खेळाडूंसाठी बोली लावली गेली नाही. यामध्ये मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैना याला खरेदी करण्यात कोणत्याही फ्रँचायझीने रस दाखवला नाही. तर भारतासाठी विश्वचषक खेळणाऱ्या मोहित शर्मा (Mohit Sharma) याचे या लिलावानंतर नशीब फिरले. टी-20 विश्वचषक 2014 आणि आयसीसी विश्वचषक 2015 दरम्यान टीम इंडियाचा (Team India) भाग असलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा आयपीएल (IPL) 2022 मध्ये दिसणार आहे परंतु यामध्ये ट्विस्ट असा आहे की यावेळी तो एक खेळाडू म्हणून मैदानात उतरणार नाही. (IPL 2022: सलामीच्या सामन्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जची चिंता वाढली, ‘या’ कारणामुळे स्टार इंग्लंड अष्टपैलू खेळाडूच्या आगमनास विलंब)

मोहित हायव्होल्टेज सामन्यांसाठी इतरांना तयार करण्यात मदत करण्यासाठी नेट गोलंदाज म्हणून दिसणार आहे. मोहित शर्माने आयपीएल 2022 च्या लिलावासाठी नोंदणी केली होती, पण तो अनसोल्ड राहिला. तथापि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) फ्रँचायझीने त्याचा नेट बॉलर म्हणून ताफ्यात समावेश केला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 33 वर्षीय मोहित एकेकाळी आयपीएलमध्ये एमएस धोनीचा सर्वात विश्वासू गोलंदाज होता आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) साठी सर्वाधिक विकेट घेणारा पर्पल कॅप विजेता देखील होता. पण 2020 मध्ये CSK ने त्याला बाहेर केले आणि त्यानंतर त्याच्या कारकिर्दीत चढ-उताराचा काळ सुरू झाला. गेल्या मोसमात त्याला दिल्ली कॅपिटल्सने जोडले होते पण त्याला येथे फारसा प्रभाव पाडता आला नाही.

मोहित शर्माने 2013 मध्ये CSK कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्या हंगामात त्याने 15 सामन्यात 20 विकेट घेतल्या. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. यानंतर भारताकडून पदार्पण करताना पहिल्या वनडेत तो सामनावीर ठरला. शर्मा 2014 टी-20 विश्वचषक आणि 2015 आयसीसी एकदिवसीय विश्वचषक खेळला. मोहितने टीम इंडियासाठी एकूण 26 वनडे आणि 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने वनडेमध्ये 31 आणि टी-20मध्ये 6 विकेट घेतल्या. तसेच त्याने आयपीएलमध्ये 86 सामने खेळले आणि 92 विकेट्स घेतल्या. उल्लेखनीय म्हणजे 2014 मध्ये सर्वाधिक विकेट्स (23) घेऊन तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. दरम्यान मोहित शर्माच्या या डिमोशनमुळे चाहत्यांना देखील चांगला धक्का बसला आहे.