IPL 2022: सलामीच्या सामन्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जची चिंता वाढली, ‘या’ कारणामुळे स्टार इंग्लंड अष्टपैलू खेळाडूच्या आगमनास विलंब
मोईन अली, पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Twitter/@IPL)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमनेसामने येणार आहेत. 26 मार्च रोजी हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणार आहे. मात्र त्याआधी चेन्नई सुपर किंग्जच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. चार वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन सीएसकेला (CSK) सलामीच्या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्ज 26 मार्च रोजी होणाऱ्या आयपीएलच्या उद्घाटन सामन्यासाठी त्यांचा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली (Moeen Ali) याच्या उपलब्धतेमुळे चिंतेत आहे. मोईन अलीचा भारताचा व्हिसा अद्याप मंजूर झालेला नाही, त्यामुळे CSK च्या सलामीच्या सामन्यासाठी त्याच्या खेळण्यावर अजून संभ्रमाचे वातावरण कायम आहे. (IPL 2022: लखनऊ सुपर जायंट्सना तगडा झटका, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज Mark Wood स्पर्धेतून ‘बाहेर’)

CSK चे सीईओ काशी विश्वथन यांना आशा आहे की मोईन नियमितपणे भारतात येत असल्याने त्याला व्हिसा मिळण्यात अडचण येणार नाही. आणि लवकरच त्याचा व्हिसा मंजूर होऊन तो सुरतमध्ये सुरु असलेल्या कॅम्पमध्ये सहभागी होईल. त्यांनी म्हटले की, मोईनने 28 फेब्रुवारीला व्हिसासाठी अर्ज केला असून त्याला 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. तो नियमितपणे भारत दौऱ्यावर येत होता, पण आजपर्यंत त्याच्या हातात प्रवासाची कागदपत्रे आलेली नाहीत. सीईओ म्हणाले की मोईन अलीने त्यांना सांगितले आहे की त्यांना प्रवासाची कागदपत्रे मिळताच तो पुढील फ्लाइटने भारताला रवाना होईल. दरम्यान सोमवारपर्यंत कागदपत्रे मिळतील अशी आशा फ्रँचायझी सीईओने व्यक्त केली. सीएसकेचे खेळाडू नवीन हंगामापर्यंत सुरतमध्ये सराव करत आहेत. एमएस धोनी आणि अंबाती रायुडू यासारख्या खेळाडूंनी या महिन्याच्या सुरुवातीला सरावाला सुरुवात केली होती, तर इतर देशांतर्गत आणि परदेशी खेळाडूंनी यायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, मोईन अली याला भारतात आल्यावर तीन दिवस क्वारंटाईन करावे लागणार आहे. खेळाच्या प्रदीर्घ फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड कसोटी संघाचा तो भाग नाही. शनिवारी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्याने CSK त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. तर भारत आणि परदेशातील खेळाडूंना बबल-टू-बबल ट्रान्सफर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि भारतीय कसोटी संघाचे सदस्य बेंगळुरूमध्ये पिंक-बॉल कसोटी खेळल्यानंतर बबल-टू-बबल ट्रान्सफरद्वारे आपापल्या आयपीएल संघात सामील झाले.