Pink Ball (Photo Credits: Getty Images)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) धुरा हातात घेतल्यावर, भारतातील पिंक बॉल (Pink Ball) टेस्टला सुरुवात करणारे अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) यांनी, रविवारी अजून एक महत्वाची घोषणा केली. टीम इंडिया आता परदेशातही डे-नाईट टेस्ट (Day-Night Test) खेळण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान भारत डे-नाईट टेस्ट खेळणार आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली, ज्यास बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मान्यता दिली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने यापूर्वी भारतीय संघ डे-नाईट कसोटी खेळण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले होते.

एबीपी न्यूजच्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या अध्यक्षांनी शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीनंतर, याची पुष्टी केली की भारत पुढच्या वर्षी जानेवारीत ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर डे-नाईट टेस्ट खेळेल. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ईडन गार्डन्सवर, बांगलादेशविरूद्ध भारताने पहिली डे-नाईट टेस्ट खेळली होती आणि या सामन्यात विजय प्राप्त केला होता. रविवारी बीसीसीआयची सर्वोच्च शिखर परिषदेची बैठक झाली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. ऑस्ट्रेलिया क्रिकेटलाही पिंक बॉलसह कसोटी खेळण्यासाठी टीम इंडियाच्या होकाराची प्रतीक्षा होती.

सन 2019 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताला 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत कसोटी गुलाबी बॉलने खेळण्याची ऑफर दिली होती. पण टीम इंडियाने या बॉलचा अनुभव नसल्याचे कारण सांगत त्याला नकार दिला. 2015 मध्ये प्रथमच पिंक बॉल टेस्टची सुरुवात झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने पहिला पिंक बॉल (डे-नाईट) कसोटी सामना खेळला. यानंतर पाकिस्तान, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका, झिम्बाब्वे इत्यादी देशांनी पिंक बॉल टेस्टची सुरुवात केली, पण 2019 अखेरपर्यंत टीम इंडियाने कसोटीचे हे नवीन फॉर्मेट स्वीकारले नाही. (हेही वाचा: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जाहीर केले आयपीएल 2020 चे पूर्ण वेळापत्रक; 1 मार्चला खेळला जाईल पहिला सामना)

या वर्षाच्या अखेरीस भारत ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर, कसोटी मालिकेसाठी जाणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाही भारताबरोबर कसोटी डे-नाईट मालिका पिंक बॉलनी खेळण्यास उत्सुक आहे.