Abhisekh Sharma (Photo Credit - X)

मुंबई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना (IND vs ENG 5th T20I 2025) आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium, Mumbai) खेळवला जात आहे. चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. तसेच जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 248 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

अभिषेक शर्माने झळकावले धमाकेदार शतक 

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 9 गडी गमावून 247 धावा केल्या. यादरम्यान अभिषेक शर्माने धमाकेदार शतक झळकावले. अभिषेक शर्माने 54 चेंडूंचा सामना करत 135 धावा केल्या. त्याने 13 षटकार आणि 7 चौकार मारले. शिवम दुबेने 13 चेंडूत 30 धावा केल्या. तिलक वर्माने 24 धावांची खेळी केली. संजू सॅमसनने 16 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 2 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या 9 धावा करून बाद झाला.

ब्रायडन कार्सने घेतल्या 3 विकेट 

इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने 3 विकेट घेतल्या. त्याने 4 षटकांत 38 धावा दिल्या. मार्क वूडने 2 विकेट घेतल्या. संघासाठी जेमी ओव्हरटन सर्वात महागडा ठरला. त्याने 3 षटकांत 48 धावा देत 1 विकेट घेतली. जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 20 षटकांत 248 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून मालिकेचा शेवट विजयाने करायचा आहे.