IND vs PAK Asia Cup Final 2025: आशिया कप २०२५ च्या दोन फायनलिस्ट संघांची नावे निश्चित झाली आहेत. येत्या २८ सप्टेंबर रोजी दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे. आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच हे दोन्ही संघ फायनलमध्ये आमनेसामने येत आहेत. क्रिकेट चाहते तब्बल ४१ वर्षांपासून या महामुकाबल्याची वाट पाहत होते. टीम इंडियाने सलग ५ सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली आहे, तर पाकिस्तानने ६ पैकी ४ सामने जिंकून विजेतेपदासाठीचे तिकीट मिळवले आहे. सुपर ४ मधील नॉकआऊट सामन्यात त्यांनी बांगलादेशला ११ धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

फायनलपर्यंतचा प्रवास

आशिया कप २०२५ मध्ये एकूण ६ संघांनी सहभाग घेतला होता. यातील चार संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडले. त्यानंतर सुपर ४ मध्ये आलेल्या भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांपैकी भारत आणि पाकिस्तानने टॉप २ मध्ये स्थान मिळवून अंतिम सामन्यात जागा निश्चित केली आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेज आणि सुपर ४ मध्ये अजेय राहिली आहे, त्यांनी सर्व ५ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने ४ सामने जिंकून आपली दावेदारी सिद्ध केली. त्यामुळे आता दोन्ही संघांमधील विजेतेपदाची ही लढत अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे.

Mohsin Naqvi Controversial Post: हरिस रौफनंतर आता पीसीबी अध्यक्षांनीही डिवचले; मोहसिन नकवींची वादग्रस्त पोस्ट, भारतीय चाहते संतप्त

पहिल्यांदाच आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानची फायनल

आशिया कपची सुरुवात १९८४ मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत या स्पर्धेत अनेक रोमांचक सामने झाले, पण भारत आणि पाकिस्तान कधीही फायनलमध्ये थेट आमने-सामने आले नव्हते. ही ४१ वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. याआधी भारत आणि पाकिस्तानची विजेतेपदाची लढत खूप कमी स्पर्धांमध्ये झाली आहे. २००७ च्या टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला हरवून इतिहास रचला होता, तर २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला मात दिली होती. आता दोन्ही संघ पुन्हा एकदा निर्णायक लढतीसाठी सज्ज झाले आहेत. टीम इंडिया आपले ९ वे विजेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरेल, तर पाकिस्तानची नजर तिसऱ्या ट्रॉफीवर असेल.

आतापर्यंत १२ फायनल झाल्या

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फायनल सामन्यांचा विचार केल्यास, आतापर्यंत १२ वेळा दोन्ही संघांची विजेतेपदाची लढत झाली आहे. आता १३ व्यांदा ते एका मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भिडणार आहेत. याआधी झालेल्या १२ फायनलपैकी ८ वेळा पाकिस्तानने तर ४ वेळा भारताने विजय मिळवला आहे. २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दोन्ही संघ शेवटचे विजेतेपदासाठी भिडले होते, तेव्हाही पाकिस्ताननेच बाजी मारली होती. त्यामुळे आता या वेळी टीम इंडिया त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे.