Mohsin Naqvi Controversial Social Media Post: आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानी संघ मैदानातील आपल्या खेळापेक्षा 'वादग्रस्त कृतीं'मुळे अधिक चर्चेत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सुपर-४ सामन्यादरम्यान हरिस रौफ आणि साहिबजादा फरहानसारख्या खेळाडूंनी केलेल्या आक्षेपार्ह सेलिब्रेशननंतर, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनीही सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर करून नवा वाद निर्माण केला आहे. या पोस्टमध्ये नकवी यांनी दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'एरोप्लेन' उडवण्याच्या हावभावासह एक फोटो शेअर केला आहे.

नकवींची ही कृती भारतीय चाहत्यांना डिवचणारी मानली जात आहे. सुपर-४ च्या सामन्यादरम्यान, हरिस रौफनेही असाच 'फायटर जेट' खाली पाडण्याचा इशारा केला होता, ज्याच्या विरोधात बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. नकवींची पोस्ट हरिस रौफच्या कृतीचे समर्थन करणारी असल्याचे मानले जात आहे. या प्रकारानंतर भारतीय चाहते संतप्त झाले असून, ते पीसीबीवर दोन वर्षांच्या बंदीची मागणी करत आहेत.

IND vs PAK: ‘ड्रामेबाजी’ महागात पडली; हरिस रौफ आणि साहिबजादा फरहानविरोधात BCCI ने ICC कडे केली तक्रार

फायनलमध्येही भारत-पाक भिडणार?

आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला ४१ धावांनी हरवून अंतिम सामन्यातील आपले स्थान निश्चित केले आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 'करो या मरो'चा सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे जर पाकिस्तानने हा सामना जिंकला, तर एशिया कपमध्ये तिसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पाहायला मिळू शकतो.