Photo Credit- X

IND vs PAK: आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानी संघ मैदानातील आपल्या खेळापेक्षा अधिक 'ड्रामेबाजी'मुळे चर्चेत आहे. २१ सप्टेंबर रोजी दुबईत झालेल्या सुपर-४ च्या सामन्यात पाकिस्तानचे दोन खेळाडू साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांनी केलेल्या लाजिरवाण्या कृतीनंतर आता बीसीसीआयने कठोर पाऊल उचलले आहे. बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंविरोधात आयसीसीकडे (ICC) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. PAK vs BAN Super 4 Live Streming: अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी पाकिस्तान-बांगलादेश भिडणार; कोणता संघ विजयी होणार?

हरिस रौफ आणि फरहानची आक्षेपार्ह कृती

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिस रौफ सतत भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न करत होता. बाउंड्रीवर क्षेत्ररक्षण करत असताना, भारतीय चाहत्यांनी 'कोहली-कोहली' असा जयघोष केल्यानंतर, रौफने विमान पाडण्याचा इशारा करत आक्षेपार्ह हावभाव केले होते.

त्याच सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बंदूक चालवल्याचा इशारा करत त्याचे सेलिब्रेशन केले होते. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, फरहानने सामन्यानंतर सांगितले की, ‘मी पन्नास धावांवर फारसे सेलिब्रेशन करत नाही, पण अचानक माझ्या मनात आले आणि मी ते केले. लोक याचा कसा अर्थ घेतील याची मला पर्वा नाही.’

आयसीसीसमोर द्यावे लागेल स्पष्टीकरण

बीसीसीआयच्या तक्रारीनंतर हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांनी जर हे आरोप लेखी स्वरूपात नाकारले, तर त्यांना सुनावणीसाठी आयसीसीच्या एलिट पॅनेल रेफरी रिची रिचर्डसनसमोर हजर राहावे लागू शकते. जर ते आपल्या कृत्यांना नियमांनुसार योग्य असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांना काही सामन्यांसाठी प्रतिबंधाचाही सामना करावा लागू शकतो.

बीसीसीआयच्या या तक्रारीला उत्तर म्हणून पीसीबीनेही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवच्या एका वक्तव्याविरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार १४ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्याशी संबंधित असल्यामुळे, ७ दिवसांच्या आत तक्रार दाखल करण्याच्या नियमानुसार आयसीसी त्यांची तक्रार फेटाळून लावू शकते.