IND vs SA: भारताचा वनडे संघ जाहीर, रोहित शर्मा बाहेर, केएल राहुल कर्णधार
केएल राहुल (Photo Credit: PTI)

दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची (IND vs SA) घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) एकदिवसीय मालिकेतून बाहेर असल्याची मोठी बातमी आहे. रोहित शर्मा हाताच्या दुखापतीतून सावरू शकलेला नाही. रोहित शर्माच्या जागी केएल राहुल (KL Rahul) वनडे संघाचे नेतृत्व करेल. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय ऑफस्पिनर आर अश्विनचे (Ravichandran Ashwin) ​​तब्बल 4 वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. अश्विन 2017 मध्ये शेवटचा वनडे खेळला होता. निवडकर्त्यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि अष्टपैलू व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांचा एकदिवसीय संघात समावेश केला आहे. युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर यांचेही वनडे संघात पुनरागमन झाले आहे.

Tweet

एकदिवसीय मालिकेसाठी संघ

के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

कसोटी मालिकेनंतर, एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून बोलंड पार्क, पार्ल येथे सुरू होईल. याच मैदानावर 21 जानेवारीला दुसरा वनडे सामनाही होणार आहे. 23 जानेवारीला केपटाऊनमध्ये अंतिम वनडे होणार आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होतील. (हे ही वाचा U19 Asia Cup Final: टीम इंडिया बनली चॅम्पियन, फायनलमध्ये श्रीलंकेला केल पराभुत.)

दक्षिण आफ्रिकेत भारताचा एकदिवसीय विक्रम काय आहे?

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड खूपच खराब आहे. संघाने 34 पैकी फक्त 10 एकदिवसीय सामने जिंकले आहेत आणि 22 गमावले आहेत. मात्र, गेल्या दौऱ्यावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीवर प्रथमच वनडे मालिकेत पराभूत केले. भारताने 6 सामन्यांची मालिका 5-1 ने जिंकली. याआधी खेळलेल्या 6 वनडे मालिकेत ते पराभूत झाले होते.