ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला कसोटी (Photo Credit: Twitter/ICC)

IND-W vs AUS-W D/N Test Day 1: क्वीन्सलँडच्या मेट्रिकॉन स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया महिला (Australia Women) आणि भारत महिला (India Women) संघात आजपासून ऐतिहासिक पिंक बॉल टेस्ट (Pink Ball Test) सामन्याची सुरुवात झाली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी अंतिम दोन सत्रात पावसानेच बॅटिंग केली ज्यामुळे दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. सामन्यात टॉस गमावून भारताने पहिले करून 44.1 ओव्हरमध्ये दिवसाखेर धावा केल्या आहेत. संघासाठी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) 80 धावा आणि पूनम राऊत (Punam Raut) 16 धावा करून नाबाद राहिली. याशिवाय शेफाली वर्माने (Shafali Verma) 31 धावा केल्या. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगने (Meg Lanning) टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगसाठी बोलावले, पण मंधाना-वर्माच्या सलामी जोडीच्या आक्रमक खेळीपुढे तो निर्णय अपयशी ठरला. कांगारू संघासाठी सोफी मोलिनेक्सने एकमात्र विकेट घेतली. (IND W vs AUS W Day/Night Test: ऐतिहासिक गुलाबी कसोटीत स्मृती मंधानाने घडवला इतिहास, असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटर)

मेग लॅनिंगच्या नेतृत्वातील कांगारू संघ 2017 नंतर पहिला दिवस/रात्र कसोटी सामना खेळत आहे. तर भारत महिला संघ पहिला गुलाबी कसोटी सामना खेळत आहे. मिताली राज या सामन्यात संघाचे नेतृत्व करत आहे. अशास्थितीत संघाने विशेषतः सलामीवीर स्मृती मंधानाने नवीन चेंडूने वर्चस्व गाजवले. स्मृती व शेफालीची सलामी जोडी ऑस्ट्रेलियन संघावर बरसली. वर्मा यादरम्यान अस्वस्थ दिसली पण स्मृतीने स्वतःवर दडपण येऊ दिले नाही आणि ती हात उघडून चौकार-षटकार खेचत राहिली. याच दरम्यान तिने वेगाने आपले तिसरे अर्धशतक ठोकले. या डावात स्मृतीने 11 चौकार लगावले. मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. शेफालीने 31 धावा केल्या. शेफालीने आपल्या खेळीत 64 चेंडूंचा सामना केला आणि चार चौकार लगावले. यानंतर पावसाने सामन्यात व्यत्यय आणण्यापूर्वी स्मृती पूनम राऊतच्या साथीने संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात आहे. आता दुसऱ्या दिवशी त्यांचे लक्ष यजमान संघावर मोठी आघाडी घेऊन चांगली गोलंदाजी करण्यावर असेल.

ऑस्ट्रेलिया व भारतीय संघातील या ऐतिहासिक कसोटी सामन्यात अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, डार्सी ब्राऊन आणि स्टेला कॅम्पबेल यांनी कांगारू संघासाठी पदार्पण केले तर यस्तिका भाटिया आणि मेघना सिंह यांनी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.