IND vs WI 3rd ODI: कटक वनडेमध्ये रोहित शर्मा याने मोडला सनथ जयसूर्या याचा 22 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड, बनला No 1 Opener
रोहित शर्मा (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा निर्णायक सामना रविवारी कटक (Cuttack) मध्ये खेळला जात आहे. टॉस गमावून पहिले फलंदाज करणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 316 धावांचे आव्हान दिले. विंडीजने निकोलस पुरन आणि कर्णधार किरोन पोलार्ड यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विंडीजने टीम इंडियासमोर मोठी धाव संख्या उभारली. विंडीजने दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. यामध्ये रोहितने 9 धावा करताच माजी श्रीलंका क्रिकेटपटू सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) यांचा 22 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. रोहित सलामी फलंदाजाच्या रूपात एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. रोहितने 2019 मध्ये आजवर डावाची सुरुवात करत 2442 धावा केल्या आहेत, तर जयसूर्याने 1997 मध्ये 2387 धावा केल्या होत्या. (IND vs WI 3rd ODI: निकोलस पुरन-किरोन पोलार्ड यांचे संघर्षपूर्ण अर्धशतक, वेस्ट इंडिजचे भारताला विजयासाठी 316 धावांचे आव्हान)

रोहितने विशाखापट्टणममध्ये 159 धावा केल्या होत्या. यंदाच्या वनडेत हे त्याचे सातवे शतक होते. यंदाच्या विश्वचषकमध्ये रोहितने पाच शतकं ठोकली होती आणि विश्वचषकात सर्वाधिक शतकं ठोकणारा फलंदाज ठरला होता. याशिवाय कसोटीत डावाची सुरुवात करण्याचीही संधीही त्याला मिळाली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत त्याने तीन शतकं ठोकली, यात एक दुहेरी शतक देखील सामिल आहे. यावर्षी रोहितने वनडेमध्ये 1427, टी-20 मध्ये 396 आणि टेस्टमध्ये 556 धावा केल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वी झालेल्या विशाखापट्टणममधील मॅचमध्ये रोहितने केएल राहुल याच्या साथीने द्विशतकीय भागीदारी करत भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला होता. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी झाली. रोहित आणि राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रोहितने आतापर्यंत मालिकेच्या दोन सामन्यात 36 आणि 159 धावांचा डाव खेळला आहे.