IND vs SL Pink-Ball Test Day 2: खेळाडू तो असतो जो प्रत्येक रंगात स्वतःला मिसळून घेतो. आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah0 त्याचे उत्तम उदाहरण ठरला आहे. लाल आणि व्हाईट बॉलने 5 विकेट्स घेतल्यानंतर त्याने आता पहिल्या गुलाबी चेंडूनेही अशीच कामगिरी केली आहे. बंगळुरू (Bangalore) येथे भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात सुरु असलेल्या पिंक-बॉल कसोटीच्या पहिल्या डावात त्याने हा पराक्रम केला. पहिल्या दिवस/रात्र कसोटीत (Day/Night Test) प्रथमच पाच विकेट घेत त्याने श्रीलंका संघाचं कंबरडं तर मोडलंच पण मोठ्या गोलंदाजांचे विक्रमही धुळीस मिळवले. बुमराहने पिंक बॉल कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेचा अवघ्या 109 धावांवर गुंडाळला. यादरम्यान एकट्या बुमराहने 10 पैकी 5 विकेट घेतल्या. त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात फक्त 10 षटके टाकली आणि 24 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. (IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेचे वाघ पहिल्या डावात 109 धावांवर ढेर; जसप्रीत बुमराह याच्या मायदेशात घेतल्या पाच विकेट, भारताकडे 143 रन्सची आघाडी)
बुमराहने भारतीय भूमीवर प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेत 5 बळी घेतले आहेत. तर पिंक बॉल कसोटीत पाच विकेट घेण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. बुमराहने आतापर्यंत 29 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही 8 वी वेळ ठरली. आणि अशी कामगिरी करताना त्याने काही गोलंदाजांचे रेकॉर्ड तोडले तर काहींची बरोबरी केली. बुमराह आता सर्वात कमी कसोटी सामन्यात सर्वाधिक 5 बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. या प्रकरणात त्याने माजी दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांना मागे टाकले आहे. देव यांनी 30 कसोटी सामन्यात 8 वेळा 5 किंवा अधिक विकेट घेतल्या. याशिवाय इरफान पठाण या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे, ज्याने 29 कसोटीत 7 वेळा 5 अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
दरम्यान श्रीलंकेने दुसऱ्या दिवशी 6 बाद 86 धावांपासून पुढे खेळण्यास सुरु केली. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशी देखील भारतीय भेदक माऱ्यापुढे लंकन खेळाडूंनी गुडघे टेकले, परिणामी संपूर्ण संघ 109 धावांत बाद झाला आणि भारताला 143 धावांची मोठी आघाडी मिळाली. अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक 43 धावांची झुंजार खेळी केली, तर निरोशन डिकवेलाने 21 धावा केल्या.