Shreyas Iyer ‘Nervous 90s’: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बेंगलोरच्या (Bangalore) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या दिवस/रात्र कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात 252 धावा केल्या. धुरंधर खेळाडू नियमित अंतराने लंकन गोलंदाजांचे बळी पडत असताना श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने एक हाती मोर्चा सांभाळला आणि संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने सर्वाधिक 92 धावा केल्या. अय्यरने या काळात 98 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकार व 4 षटकार खेचले. अय्यर मात्र कारकिर्दीतील दुसरे शतक हुकल. स्टंप आऊट झाल्यानंतर तो नर्व्हस नाइन्टीजचा बळी ठरला. यासह अय्यर आता सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग सारख्या दिग्गज भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. (IND vs SL Pink-Ball Test Day 1: बेंगलोरमध्ये लढवय्या श्रेयस अय्यर याचे शतक हुकले, घरच्या मैदानावर टीम इंडियाचे शेर 252 धावांत ढेर)
अय्यर हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे जो स्टंपच्या रूपात नर्वस नाईन्टीजचा बळी पडला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या सारखे दिग्गज फलंदाजही विकेटच्या मागे नर्व्हस नाईन्टीजचे बळी पडले आहेत. अय्यरच्या आधी सेहवाग कसोटी क्रिकेटमध्ये स्टंपच्या रूपाने नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला होता. 2010 मध्ये कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध सेहवाग 99 धावांवर स्टंप आऊट झाला होता. सेहवागपूर्वी सचिन तेंडुलकरला 2001 मध्ये बंगळुरूमध्ये इंग्लंडविरुद्ध स्टंप आऊट होऊन नर्व्हस नाईंटीचा फटका बसला होता. सचिनने त्या सामन्यात 95 धावा केल्या होत्या. इतकंच नाही तर माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांचाही कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीमागे नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरलेल्या फलंदाजांमध्ये समावेश आहे. वेंगसरकर 1987 मध्ये चेन्नईमध्ये पाकिस्तानविरुद्ध 96 धावांत स्टंप आऊट झाले होते.
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील पिंक-बॉल कसोटी सामन्याबद्दल बोलायचे तर पहिल्या दिवशी दुसऱ्याच सत्रात भारताचा डाव 252 धावांत आटोपला. श्रेयस अय्यरने 98 चेंडूंत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 92 धावा केल्या. तर विराट कोहलीने 23 आणि ऋषभ पंतने 39 धावांचे छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे, श्रीलंकेकडून लसिथ एम्बुल्डेनिया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन तर धनंजया डी सिल्वाने दोन आणि सुरंगा लकमलने एक विकेट घेतली.