श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IND vs SL Series 2022: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 204 धावा चोपल्या आणि मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. या मालिकेच्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईकर फलंदाजाने नाबाद अर्धशतक झळकावले. अंतिम सामन्यात त्याने 45 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या. सामन्यानंतर श्रेयस म्हणाला की, सर्वप्रथम मला हा क्षण जपायचा आहे. या टी-20 मालिकेत मी चांगला स्कोर केला आहेत. मला थोडी विश्रांती घ्यायची आहे. मला स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि जास्त विचार करायचा नाही. मला आत्ता या क्षणी राहायचे आहे. तो म्हणाला की, जर तुम्ही टी-20 सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली तर तुम्ही येथे तुमच्या डावाची चांगली तयारी करू शकता. पण क्रमवारीत फलंदाजी करताना तुम्ही स्वत:ला वेळ देऊ शकत नाही आणि पहिल्या चेंडूवरच मोठे शॉट्स खेळावे लागतात. श्रेयसचे हे विधान ऐकून भविष्यात माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागेला धोका निर्माण होऊ शकतो असे दिसत आहे. (IND vs SL: आपल्या झंझावाती खेळीने ‘हा’ खेळाडू टीम इंडियासाठी सामना जिंकत राहिला; रोहित शर्माने निवड सोपी नसल्याची दिली कबुली)

“मी माझ्याकडून किंवा संघाच्या प्रशिक्षकांकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही कारण जर तुम्ही आमच्या संघातील स्पर्धा पाहिली तर ती अफाट आहे. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सामना जिंकून देण्यास सक्षम आहे. वैयक्तिकरित्या मला प्रत्येक क्षणाचा आणि संधीचा आनंद घ्यायचा आहे. मला खेळ संपवायला आवडते आणि जेव्हाही मी खेळपट्टीवर जातो तेव्हा हीच माझी मानसिकता असते,” PTI ने अय्यरने सामन्यानंतर म्हणणे उद्धृत केले. तथापि, श्रेयस पुढे म्हणाला की पर्याय दिल्यास तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला प्राधान्य देईल. “नक्कीच या फॉरमॅटमध्ये, टॉप-थ्री ही एकमेव जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या डावाला चांगला वेग देऊ शकता. अन्यथा तुम्ही क्रमाने फलंदाजी केलीत तर तुम्ही देऊ शकत नाही. स्वत:ला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला पहिल्या चेंडूपासून सुरुवात करायची आहे. त्यामुळे मला वैयक्तिकरित्या फलंदाजीसाठी सर्वोत्तम क्रमांक सांगायचा असेल तर तो साहजिकच क्रमांक 3 आहे,” तो म्हणाला.

लक्षात घ्यायचे की या महिन्याच्या सुरुवातीला आयपीएल 2022 लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केल्यावर 12.25 कोटी रुपयांची तिसरी सर्वाधिक बोली मिळालेल्या श्रेयसला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. पण आता या फलंदाजाने गेल्या पाच सामन्यांमध्ये चार अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये या महिन्याच्या सुरुवातीला विंडीजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 80 धावांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत मर्यादित षटकांच्या मालिकेत प्रभावी कामगिरी केलेला अय्यर आगामी कसोटी मालिकेत निर्णायक भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.