IND vs SL 1st T20I: श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध 24 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरु होण्यापूर्वी यजमान टीम इंडियाला (Team India) दुहेरी धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर आता वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाही. बीसीसीआयने (BCCI) निवेदन जाहीर करून पुष्टी केली. सूर्यकुमारच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झाला, तर चहरला विंडीजविरुद्ध तिसऱ्या व शेवटच्या टी-20 सामन्यात गोलंदाजी करताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, सूर्यकुमारने मालिकेपूर्वी लखनऊ येथे सराव सत्रात भाग घेतला होता, परंतु आता त्याला अनफिट घोषित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता या दोन्ही धाकड खेळाडूंच्या जागी श्रीलंकेविरुद्ध आगामी मालिकेसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाची वर्णी लागणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. चाहर आणि SKY यांची भारतीय XI मध्ये जागा घेण्यासाठी काही प्रबळ दावेदार आहेत. (IND vs SL T20I 2022: दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेतून बाहेर, BCCI कडून बदली खेळाडूंची घोषणा नाही)
सूर्यकुमार यादवने मधल्या फळीत गेल्या काही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकाचा मुख्य दावेदार बनवले गेले आहे. पण आता सूर्या दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी स्टार विकेटकीपर-फलंदाजाला संधी दिली जाण्याची शक्यता वाढली आहे आणि तो म्हणजे संजू सॅमसन आहे. संजूने आयपीएलमध्ये अनेकदा आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली आहे, पण त्याला भारतीय संघात फार संधी दिली नाही. अशा परिस्थितीत आता यादव मालिकेतून बाहेर पडल्यामुळे सॅमसनसाठी संघाचे दार पुन्हा उघडू शकते. संजू मैदानात एकदा सेट झालो की तो गोलंदाजांचां चांगलाच समाचार घेतो. त्याची फटकेबाजी अनेकांनी आयपीएलमध्ये पाहिली आहे. सॅमसन टीम इंडियाकडून अखेरचा जुलै 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर खेळला होता. मात्र संजूला तेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.
दुसरीकडे, आक्रमक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध दीपक चाहरच्या जागी आता मोहम्मद सिराजची भारतीय संघात वर्णी लागू शकते. विंडीजविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेसाठी सिराजची निवड होऊनही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. याशिवाय आवेश खान देखील चाहरच्या जागी सलग दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा दावेदार ठरू शकतो. श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका लक्षात घेऊन सिराजला पुन्हा विश्रांती देऊन आवेश खानला आणखी एक संधी दिली जाऊ शकते.