IND vs SA ODIs 2022: दक्षिण आफ्रिकेला पुन्हा त्यांच्या घरात पराभूत करण्यासाठी टीम इंडियाला ‘या’ 3 गोष्टी सुनिश्चित कराव्या लागतील
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SA ODIs 2022: तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभवाचे तोंड पाहिलेली टीम इंडिया (Team India) नव्या उत्साहाने वनडे सामन्यांसाठी मैदानात उतरेल. आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये संतुलन आणण्याच्या उद्देशाने खेळताना दिसेल. अनेक नवीन खेळाडूंना संघात सामील करून केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात भारत कसोटी मालिकेतील पराभव विसरून पुढे जाण्यासाठी सज्ज असेल. माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात 2018 मध्ये आफ्रिकन दौऱ्यावर Proteas विरुद्ध भारताच्या मागील एकदिवसीय यशाची पुनरावृत्ती राहुलची सेना करू शकणार का? याबद्दल अनेकांमध्ये उत्सुकता लागून असेल. भारताने गेल्या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा 5-1 असा पराभव केला आणि आता ते त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करू पाहतील. तथापि त्यांना खालील तीन गोष्टी सुनिश्चित करणे गरजेचे असेल. (India’s Likely Playing XI for 1st ODI: पहिल्या वनडेमध्ये भारताचे 11 धाकड खेळाडू देणार दक्षिण आफ्रिकेला टक्कर, ‘या’ अष्टपैलूला मिळू शकते डेब्यू तिकीट)

1. मधली फळी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत मधल्या फळीतील सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्यावर जबाबदारी असेल. श्रेयस आणि पंत व्हाईट बॉल क्रिकेटमधील त्यांच्या अलीकडील फॉर्मची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतील तर सूर्यकुमार यादव नुकत्याच संपलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खराब कामगिरीनंतर फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करेल.

2. विराट कोहलीचा फॉर्म

2018 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला तेव्हा कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 186 च्या सरासरीने 558 धावा चोपल्या होत्या ज्यात तीन शतके आणि एक अर्धशतक होते. तथापि दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत त्याने गेल्या 12 सामन्यांमध्ये फक्त 560 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटचा फॉर्म संघासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो.

3. युजवेंद्र चहलच्या फिरकीची जादू

युजवेंद्र चहल पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत आपली जादू चालवण्यासाठी उत्सुक असेल. गेल्या Proteas दौऱ्यावर त्याने 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5.02 च्या अपवादात्मक इकॉनॉमी रेट आणि 16.37 च्या सरासरीने 16 बळी घेतले होते. अनुभवी रविचंद्रन अश्विनने त्याला साथ देणे गरजेचे असेल. करणे चहलला गेल्या दौऱ्यावर कुलदीप यादवची साथ मिळाली होती. आणि कुलदीपने देखील चांगले प्रदर्शन करून 4.62 च्या इकॉनॉमीने 17 विकेट घेतल्या होत्या.