IND vs SA 1st ODI 2022: पहिला मान दक्षिण आफ्रिकेचा; टीम इंडियाला 31 धावांनी लोळवून Proteas ची मालिकेत 1-0 ने आघाडी, धवन-कोहलीचे अर्धशतक वाया
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 1st ODI: भारताविरुद्ध पार्लच्या बोलंड पार्क येथे मालिकेच्या पहिल्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने 31 धावांनी विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवासह ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांची झुंजार अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. Proteas ने दिलेल्या 297 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 50 षटकात 265 धावाच करू शकली. भारताकडून धवनने 79 तर कोहलीने 51 धावांची झुंज दिली पण आफ्रिकी गोलंदाजांच्या भेदक आक्रमणापुढे अन्य धुरंधर फलंदाजांनी गुडघे टेकल्यामुळे संघाला पराभव पत्करावा लागला. यजमान संघाकडून लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी आणि आदिल फेहलुकवायोने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. (IND vs SA 1st ODI: ‘गोलंदाजी कारवाईची नसेल तर खेळवू नका’, ‘या’ तडाखेबाज खेळाडूच्या उपस्थितीवर आकाश चोप्राने KL Rahul याच्या डावपेचांवर उचलले बोट)

भारताविरुद्ध मालिकेच्या सलामीच्या सामन्यात कर्णधार टेंबा बावुमा आणि रसी वॅन डर डुसेन यांनी शतकी खेळी करत दक्षिण आफ्रिकेला निर्धारित 50 षटकात 4 गडी गमावत 296 धावांपर्यंत मजल मारून दिली. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना केएल राहुल आणि धवनने भारताला वेगवान सुरुवात करून दिली पण कर्णधार राहुल 12 धावा करून मार्करमच्या चेंडूवर विकेटच्या मागे झेलबाद झाला. राहुल परतल्यावर धवनने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवत 51 चेंडूत 8 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. तथापि केशव महाराजने त्याला 79 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. कर्णधारपदावरून हटल्यानंतर प्रथमच वनडे खेळायला आलेल्या कोहलीने 60 चेंडूत 3 चौकारांसह अर्धशतकी पल्ला गाठला. पण अर्धशतक झळकावल्यानंतर आणखी एक धाव करून शम्सीच्या चेंडूवर बावुमाकरवी झेलबाद झाला. यानंतर भारतीय फलंदाजांच्या पडझड सुरूच राहिली. श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि पदारपणेवीर व्यंकटेश अय्यर फ्लॉप ठरले.

रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार नियमित अंतराने माघार परतले. तर शार्दूल ठाकूर 50 धावा आणि जसप्रीत बुमराह 14 धावा करून नाबाद राहिले. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी बावुमाने 143 चेंडूत 110 धावांची खेळी केली. तर वॅन डर डुसेन 96 चेंडूत 129 धावांची नाबाद तुफान खेळी केली. भारतासाठी जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला ज्याने दोन विकेट घेतल्या. तसेच रविचंद्रन अश्विनला एक विकेट मिळाली. दरम्यान दोन्ही संघातील पुढील सामना आता 21 जानेवारी रोजी याच मैदानावर खेळला जाईल.