विराट कोहली आणि बाबर आजम (Photo Credit: Facebook)

T20 World Cup 2021: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट  टीममध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. आयसीसी टी-20 विश्वचषकच्या आपल्या पहिल्याच सुपर-12 सामन्यात दोन्ही संघ एकमेकांपुढे उभे आहेत. आजच्या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने सामन्यापूर्वीच 12 सदस्यीय संघ घोषित केला होता तर पाकिस्तानने हैदर अलीला डच्चू दिला आहे. टीम इंडिया कर्णधार विराटने टॉस दरम्यान प्लेइंग इलेव्हनवर शिक्कामोर्तब केला आहे. रोहित शर्मा व केएल राहुल सलामीला उतरतील. तर सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आले असून ईशान किशनला बेंचवर बसवण्यात आले आहेत. तसेच फॉर्मशी संघर्ष करणाऱ्या हार्दिक पांड्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. गोलंदाजी विभागात भुवनेश्वर कुमारला डच्चू देण्यात आला आहे. (T20 World Cup 2021, IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध सामन्यापूर्वी ‘भारत आर्मी’ने केला विराट कोहली आणि टीम इंडियाचा जयघोष)

भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 5 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये प्रत्येक वेळी टीम इंडिया वरचढ ठरली आहे. तर एकूण टी-20 सामन्यांचा विचार करता 8 वेळा दोघेही भिडले असून भारत 6 वेळा तर पाकिस्तानने एकदा बाजू मारली असून एक सामना अनिर्णीत सुटला आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यात भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आपला 100% रेकॉर्ड कायम ठेवण्याच्या उद्देशाने आणि स्पर्धेत विजयी सलामी देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. उल्लेखनीय आहे की विराट कोहली टी-20 विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून पाहिल्याचं मैदानात उतरणार आहे. यापूर्वी 2007 ते 2016 टी-20 विश्वचषक स्पर्धेत माजी कर्णधार एमएस धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

भारत आणि पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहेत:

भारत प्लेइंग XI: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि वरुण चक्रवर्ती.

पाकिस्तान प्लेइंग XI: बाबर आजम (कॅप्टन), मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह आफ्रिदी, हसन हली आणि हारिस रऊफ.