केएल राहुल (Photo Credit: PTI)

कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला (Indian Team) मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा (Team India) सलामीवीर केएल राहुलची (KL Rahul) दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून एक्झिट झाली आहे. अशा परिस्थितीत राहुलच्या जागी सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलच्या डाव्या मांडीच्या स्नायूमध्ये ताण आला होता त्यामुळे तो संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे कारण आधीच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय सामना खेळणार आहे.  राहुलला विश्रांती देण्यात आली असून, त्यानंतर तो एनसीएसाठी तयारी करेल आणि पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी फिट होईल. (IND vs NZ 1st Test: कानपूर कसोटीपूर्वी चेतेश्वर पुजाराची मोठी घोषणा, ‘या’ मानसिकतेने उतरणार मैदानात- म्हणाला ‘शतक न करणे चिंतेची बाब नाही’)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत, पहिला सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये तर दुसरा सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळला जाईल. पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करेल, मात्र दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करेल. दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार शुभमन गिल (Shubman Gill) संघाच्या नेट सत्रादरम्यान मयंक अग्रवालसह फलंदाजी करताना दिसला. केएल राहुल देखील आता मालिकेतून बाहेर पडल्यामुळे शुभमन आणि मयंक किवींविरुद्ध सामन्यात सलामीला उतरताना दिसतील. तर श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकजण कसोटी पदार्पण करेल आणि मधल्या फळीत फलंदाजी करेल असे समजले जात आहे. शुभमनने मधल्या फळीत फलंदाजी करणे अपेक्षित होते, परंतु आता राहुलच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूला त्याच्या नेहमीच्या ओपनिंग स्लॉटमध्ये खेळण्यास सांगितले जाईल. उल्लेखनीय आहे की सूर्यकुमारही इंग्लंड दौऱ्यावर देखील भारतीय संघाचा एक भाग होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.