India vs England (Photo Credits: Twitter)

IND vs ENG Test Series 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघात चार सामने खेळवले जातील. पहिले दोन सामने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) तर अखेरचे दोन सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवले जातील. केंद्र सरकारने सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला मंजुरी दिली आहे, मात्र क्रिकेट मंडळं अद्याप तयार दिसत नाही. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) भारत-इंग्लंड यांच्यातील पहिले दोन कसोटी सामने प्रेक्षकांविना होणार आहेत, असे स्पष्टीकरण तामिळनाडू क्रिकेट संघटनेने शुक्रवारी दिले. क्रीडा जग सामान्य स्थितीत परत येत असतानाही, तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (Tamil Nadu Cricket Association) स्पष्ट केले की जग कोरोना व्हायरसने सावरत असल्यामुळे चाहत्यांना टीव्हीवरच खेळाचा आनंद घ्यावा लागेल. ANI शी बोलताना टीएनसीएच्या (TNCA) एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहिल्या दोन सामन्यांमध्ये चाहते येऊ शकणार नाहीत कारण या क्षणी क्रिकेटर्सची सुरक्षा ही त्यांची प्राथमिकता आहे. (IND vs ENG Series 2021: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियातील कामगिरी पाहून इंग्लंड हादरला, माजी स्पीनर Graeme Swann यांनी दिला महत्त्वाचा सल्ला)

"आमच्या इथे कोणतेही चाहते येणार नाहीत. मालिकेत नंतर काय घडते त्याचा निर्णय बीसीसीआयने इंग्लिश क्रिकेट बोर्डासमवेत चर्चा करून घ्यावा. पण, पहिल्या दोन सामन्यांसाठी चाहत्यांना परवानगी नसेल. क्रिकेटप्रेमींनी आत्तासाठी त्यांच्या आवडत्या स्टार्सना टीव्हीवर खेळताना पाहावे लागणार आहे," अधिकाऱ्याने सांगितले. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिली कसोटी 5 ते 9 फेब्रुवारी आणि दुसरा सामना 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल. मालिकेच्या अखेरच्या दोन सामन्यांसाठी चाहत्यांना परवानगी दिली असे मानले जात आहे. मालिकेचा तिसरा आणि चौथा सामना अहमदाबाद येथे आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघातील तिसरा सामना हा दिवस/रात्र सामना असून पिंक-बॉलने खेळले जाईल.

दरम्यान, मंगळवारी चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात भारतीय निवड समितीने इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ घोषित केला आहे. विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि ईशांत शर्मा यांनी पुन्हा संघात प्रवेश केला आहे. कोहली पितृत्व रजेवरुन कमबॅक करत आहे तर ऑस्ट्रेलिया मर्यादित षटकांच्या मालिकेतून परतल्यानंतर हार्दिक आपल्या पाठीच्या फिटनेसवर ओव्हरटाईम काम करत आहे. त्याची गोलंदाजीची असमर्थता संघ व्यवस्थापनासाठी मोठी चिंता बनली आहे. इशांत शर्मालाही दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावे लागले होते, पण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत उठावदार कामगिरीने त्याला संघात स्थान मिळवून दिले.