IND vs ENG: टीम इंडियाला जोरदार धक्का; रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांना दुखापत झाली, वेदनेमुळे मैदानावर येणे झाले मुश्किल
रोहित शर्मा-चेतेश्वर पुजारा दुखापत (Photo Credit: Twitter/BCCI)

इंग्लंड (England) आणि भारत (India) यांच्यात ओव्हलवर सुरु असलेल्या चौथ्या कसोटीतून भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) पूर्णपणे फिट नाहीत. यामुळे दोन्ही खेळाडू चौथ्या दिवसाच्या खेळात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरले नाही आहेत. रोहितच्या डाव्या गुडघ्यात आणि पुजाराच्या डाव्या घोट्यात दुखापत झाली आहे. अशा स्थितीत दोघेही मैदानात उतरणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघाचा दुसरा डाव 466 धावांवर आटोपल्यानंतर ही बातमी समोर आली. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव क्षेत्ररक्षणासाठी उतरला आहे. भारताने चौथ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियाच्या (Team India) या मोठी धावसंख्येत रोहित आणि पुजाराचा मोलाचा वाटा आहे. रोहित शर्माने भारताच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले तर पुजाराने अर्धशतक केले. दोघांनी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या विकेटसाठी 153 धावांची भागीदारी केली. (IND vs ENG 4th Test Day 4: टीम इंडियाचा दुसऱ्या डावात 466 धावांचा डोंगर, इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे टार्गेट)

यादरम्यान रोहितने इंग्लंडमध्ये कसोटी शतक झळकावले, तर पुजाराने मालिकेतील दुसरे अर्धशतक ठोकले. मात्र, फलंदाजी करताना दोघांना फिजिओची मदत घ्यावी लागली. पुजाराला त्याच्या डाव्या पायासाठी मैदानातच उपचार घ्यावे लागले. तर रोहित शर्माला फलंदाजीदरम्यान इंग्लिश गोलंदाजांच्या चेंडूंवर अनेक वेळा दुखापत झाली. “रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानात उतरणार नाहीत. रोहितला डाव्या गुडघा अस्वस्थ आहे तर पुजाराला डाव्या पायाच्या घोट्यात त्रास होत आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्यांचे मूल्यांकन करत आहे,” भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) उघड केले. भारतासाठी दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक 127 धावा केल्या, तर चेतेश्वर पुजारा 61, शार्दुल ठाकूर 60 आणि रिषभ पंतने 50 अशी अर्धशतके ठोकली. दुसरीकडे, क्रिस वोक्स इंग्लंडची स्टार गोलंदाज ठरला आणि 83 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत.

दुसरीकडे, ओव्हल मैदानात चौथ्या दिवसापूर्वीचा खेळ सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांची कोरोना टेस्ट सकारात्मक आढळली होती. यानंतर शास्त्री समवेत गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना सावधगिरीचा उपाय म्हणून आयसोलेट केले असल्याचे मोठे अपडेट समोर आले होते.