टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 3rd Test Day 1: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) सुरु आहे. हा सामना गुलाबी चेंडूने दिवस/रात्र खेळला जाणार आहे. पहिल्या दिवसाच्या चहापानची वेळ झाली असून इंग्लंडने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत पहिल्या सत्रात 27 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 81 धावा केल्या आहेत. दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा इंग्लिश सलामी फलंदाज झॅक क्रॉलीने (Zack Crawley) शानदार अर्धशतक लगावलं आणि 53 धावा केल्या. क्रॉलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे चौथं अर्धशतक ठरलं. याशिवाय, बेन स्टोक्स 6 धावा आणि ओली पोप 1 धाव करून खेळत होते. डोम सिब्ली आणि जॉनी बेअरस्टो शून्यावर माघारी परतले तर कर्णधार जो रूट 17 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. दुसरीकडे टीम इंडियाने दिवसाच्या पहिल्या सत्रात दणदणीत सुरुवात केली. अक्षर पटेलने (Axar Patel) 2 तर इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 1 फलंदाज माघारी पाठवला. (IND vs ENG 3rd Test 2021: डे-नाईट टेस्टमध्ये इशांत शर्माचा कमाल, 100 वा कसोटी सामना खेळणारा ठरला 11वा भारतीय क्रिकेटर, पहा संपूर्ण लिस्ट)

पिंक-बॉल टेस्ट सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताकडून 100वा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांतने तिसऱ्याच ओव्हरमध्ये सिब्लीला शुन्यावर बाद केले. त्याचा झेल दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने घेतला. त्यानंतर, 7व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेल गोलंदाजीसाठी आला आणि त्याने सामन्यातील आपल्या पहिल्याच चेंडूवर बेरस्टोला पायचीत केले. अशास्थितीत, 7 ओव्हरमधेच इंग्लंडने दोन झटपट विकेट्स गमावल्या. यानंतर कर्णधार रुट आणि ओपनर क्रॉलीने संघाचा डाव सांभाळला. मात्र, अश्विनने इंग्लंडला मोठा धक्का आणि इंग्लंडचा कॅप्टन जो रुटला एलबीडबल्यू आऊट केलं ज्यामुळे इंग्लिश टीमने 74 धावांवर 3 विकेट गमावल्या. त्याच्यापाठोपाठ 25व्या ओव्हरमध्ये लगेचच अर्धशतक करणारा क्रॉली अक्षरच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ट होऊन माघारी परतला. झॅकने 84 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने 53 धावा केल्या. आता पहिल्या सत्रातच मोठ्या विकेट गमावल्यावर ओली पोप आणि बेन स्टोक्सवर इंग्लिश संघाची मदार असेल.

यापूर्वी, तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघाने काही मोठे बदल केले आहे. इशांत शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्याने तो त्याचा कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. शिवाय, पाहुण्या संघाने सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनयामध्ये 4 बदल केले आहेत. जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या दोघांनाही संधी दिली आहे. तसेच जॉनी बेअरस्टोचेही पुनरागमन झाले आहे.