IND vs ENG 3rd D/N Test: इंग्लंडच्या फिरकीत अडकली टीम इंडिया, पिंक-बॉलच्या पहिल्या डावात भारत 145 धावांवर तंबूत, 33 धावांची घेतली आघाडी
इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 3rd D/N Test: भारताविरुद्ध (India) पहिल्या डावात 112 धावांवर ऑलआऊट झालेल्या इंग्लंड (England) टीमने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जबरदस्त कमबॅक केलं आणि यजमान टीम इंडियाला पहिल्या डावात 145 धावांवर गुंडाळलं. इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात भारतीय संघ (Indian Team) 33 धावांची आघाडीचं घेऊ शकला. टीम इंडिया पहिल्या सत्रात 46 धावांच करू शकली आणि ऑलआऊट झाली. यजमान संघासाठी सलामी फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 66 धावा आणि कर्णधार विराट कोहलीने 27 धावांचे योगदान दिले. इंग्लिश टीमप्रमाणेच पहिल्या डावात भारतीय फलंदाज देखील पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्यात अयशस्वी ठरले. टीम इंडियाने 99/3 धावसंख्येपासून खेळण्यास सुरुवात केली पण मोठी धावसंख्या गाठण्यास अपयशी ठरली. इंग्लंड गोलंदाजांनी संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं. जॅक लीचने 4 तर कर्णधार जो रूट (Joe Root) 5 आणि जोफ्रा आर्चरला 1 विकेट मिळाली. (IND vs ENG 3rd D/N Test: 'पक्का गल्ली क्रिकेटर'! रिषभ पंतचे हास्य ऐकून घाबरला इंग्लिश फलंदाज, गोंधळून केलं असं काही, पहा गमतीशीर Video)

पिंक-टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी संघाला मोठी आघाडी मिळवून देण्याच्या उद्देशाने रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेच्या जोडीने खेळाला सुरुवात केली. मात्र, इंग्लंडच्या फिरकी आक्रमणासमोर यजमान फलंदाजांनी शरणागती पत्कारली. लीचने दिवसाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाला चौथा धक्का आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेला 7 धावांवर एलबीडबल्यू आऊट करत माघारी पाठवलं. यानंतर लीचने अर्धशतकवीर रोहितला देखील पॅव्हिलियनमध्ये धाडलं. रोहितने 96 चेंडूंमध्ये 11 फोरसह 66 धावा केल्या. रिषभ पंतही खास प्रभाव पाडू शकला नाही आणि रुटच्या गोलंदाजीवर कॅच आऊट झाला. पंत 1 धावा करुन माघाऱी परतला आणि टीम इंडियाने 117 धावांवर सहावी विकेट गमावली. भारताने वॉशिंग्टन सुंदरच्या रुपात सातवी विकेट गमावली. रुटने वॉशिंग्टन सुंदरला शून्यावर बाद केलं. रूटने एकाच ओव्हरमध्ये टीमला दोन झटके दिले आणि सुंदरपाठोपाठ लोकल बॉय अक्षर पटेलही शून्यावर माघारी परतला आहे.

यापूर्वी, इंग्लंडकडून ओपनर झॅक क्रॉलीने एकाकी झुंज देत 84 चेंडूत 10 चौकारांसह सार्वधिक 53 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर इंग्लिश फलंदाज भारतीय फिरकीपुढे स्वस्तात परतले. भारताकडून पटेलने सर्वाधिक इंग्लिश फलंदाजांना आपल्या फिरकीत अडकवले. अक्षरने 6 विकेट घेतल्या तर आर अश्विनने 3 आणि इशांत शर्माला 1 विकेट मिळाली.