IND vs ENG 3rd D/N Test Day 1: भारताविरुद्ध (India) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) सुरु असलेल्या तिसऱ्या पिंक-बॉल टेस्ट (Pink Ball Test) सामन्यात इंग्लंड संघाचा पहिला डाव 112 धावांवर संपुष्टात आला. इंग्लिश टीमसाठी सलामी फलंदाज झॅक क्रॉलीने (Zak Crawley) सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. ओपनर क्रॉलीला वगळता अन्य फलंदाज 20 धावसंख्येचा टप्पाही पार करू शकले नाही. संघ अडचणीत असताना कर्णधार जो रूट देखील खेळण्यात अपयशी ठरला आणि 17 धावा केल्या. जोफ्रा आर्चरने 11 धावा केल्या. याशिवाय, भारतीय गोलंदाजांनी विशेषतः फिरकीपटूंनी सुरुवातीपासून इंग्लिश टीमवर वर्चस्व गाजवलं आणि त्यांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. लोकल बॉय अक्षर पटेलने (Axar Patel) प्रभावित केले आणि सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. अक्षरने सलग दुसऱ्या सामन्याच्या डावात पाच विकेट घेतल्या आहेत.रविचंद्रन अश्विनला 3 आणि इशांत शर्माला 1 विकेट मिळाली. (IND vs ENG 3rd D/N Test: Ashwin याने पिंक-बॉल टेस्टमध्ये असा दूर केला जो रूटचा अडथळा, विराट कोहलीने तडफदार अंदाजात केलं सेलिब्रेट)
तिसऱ्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडलाटीम इंडियाच्या फिरकीपटूंनी एका मागोमाग एक झटके देण्याचा सपाटा लावला. कर्णधार रूटने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला पण, सुरूवातीच्या फलंदाजांनी तो चुकीचा ठरवला. आपल्या करिअरमधील 100वा सामना खेळणाऱ्या इशांतने इंग्लंड सलामीवीर डॉम सिब्लीला शून्यावर माघारी धाडलं. त्यानंतर जॉनी बेअरस्टोदेखील शून्यावर बाद झाला. इंग्लंडला सुरूवातीलाच दोन धक्के बसल्यानंतर सलामीवीर जॅक क्रॉलीने डाव सावरला. त्याने शानदार अर्धशतक केलं. पण कर्णधार रूट 17 धावांवर अश्विनची शिकार झाला. त्यानंतर क्रॉली 53 धावा ठोकून माघारी परतला. पाठोपाठ बेन स्टोक्स 6 आणि ओली पोपही 1 धाव करून स्वस्तात बाद झाले. फिरकी गोलंदाज अक्षरने जोफ्रा आर्चरला आऊट करत इंग्लंडला सातवा धक्का दिला. अश्विनने जॅक लीचला चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट केलं. यानंतर, इंग्लडने 8 विकेट्स गमावून 100 धावा पूर्ण केल्या. अक्षरने स्टुअर्ट ब्रॉडला आऊट करत सलग दुसऱ्यांदा 5 विकेट्स पाच विकेट्स घेतल्या. अखेर बेन फोक्सला बाद करत अक्षरने इंग्लंडला स्वस्तात गुंडाळलं.
इंग्लंडने संघात चार बदल केले. जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो आणि जॅक क्रॉली या चौघांना संघात स्थान देण्यात असून जो बर्न्स, डॅन लॉरेन्स, ओली स्टोन आणि मोईन अली यांना संघातून वगळण्यात आले आहेत. भारतानेही संघात दोन बदल केले. मोहम्मद सिराजच्या जागी जसप्रीत बुमराहला तसेच कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिले आहे.