IND vs ENG 2nd Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात खेळल्या जाणार्या चार सामन्यांची कसोटी मालिका खूप महत्वाची आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (ICC WTC Final) प्रवेश करणारा दुसरा संघ या मालिकेनंतर निश्चित होणार आहे. मालिकेतील पहिला सामना गमावल्याने टीम इंडियापुढे (Team India) आता टेस्ट चॅम्पियनशिपचे फायनलमध्ये (Test Championship Final) प्रवेश करण्याचा मार्ग आणखी कठीण झाला आहे. इंग्लंडने मालिकेतील पहिला सामना 227 धावांनी जिंकला आणि आता फायनल गाठण्यासाठी भारताला दुसरा सामना किंवा किमान ड्रॉ करणे गरजेचे आहे.भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेचा दुसरा सामना शनिवारी सुरू होत आहे. चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) खेळल्या जाणार्या या सामन्यात भारताला विजय आवश्यक आहे. शिवाय, पहिला सामना गमावल्यानंतर त्यांना उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले पाहिजेत. न्यूझीलंड (New Zealand) संघ टेस्ट चँपियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला असून आता भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये अखेरच्या एका स्थानासाठी चुरस पाहायला मिळत आहे. (ICC World Test Championship: इंग्लंडची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप रँकिंगमध्ये गरुडझेप, विराटसेनेची या स्थानी घसरण)
टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गाठण्यासाठी भारतीय संघाला मालिकेत किमान दोन सामने जिंकावे लागतील तर इंग्लंड एकही सामना जिंकू नये याची काळजीही घ्यावी लागेल. टीम इंडियाला 2-1 किंवा 3-1 फरकाने मालिका जिंकणे आवश्यक आहे. दुसरीकडे, इंग्लंडला फायनल गाठायचे असल्यास भारताला 3-0, 3-1 किंवा 4-0 असे पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील असावे लागेल. इतकंच नाही तर मालिकेचा निकाल 1-0, 2-0 किंवा 2-1 असा इंग्लंडच्या बाजूने लागल्यास ऑस्ट्रेलियासाठी टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा मार्ग मोकळा होईल. शिवाय, मालिका 1-1 किंवा 2-2 अशी अनिर्णीत राहिली तरी ऑस्ट्रेलिया अंतिम फेरी गाठेल. इंग्लंडचा लॉर्ड्स स्टेडियमवर 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळला जाणार आहे. यापूर्वी, कांगारू संघाने दक्षिण आफ्रिकी दौरा स्थगित केल्याचा फायदा किवी संघाला झाला आणि त्यांनी सहज फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे, आता कोणता संघ अंतिम सामन्यात न्यूझीलंडला टक्कर देईल हे भारत-इंग्लंड कसोटी मालिकेनंतरच निश्चित होईल.
दुसरीकडे, इंग्लंड आता टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामान्यापासून एक पाऊल दूर आहे. भारताविरुद्ध चेन्नई येथील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यास जो रूटची इंग्लिश टीम थेट फायनल गाठेल तर भारताचे स्वप्न धुळीस मिळेल. त्यामुळे, टीम इंडिया सर्वतोपरीने विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.