टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test Day 2: चेन्नईच्या (Chennai) एम. ए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दिवसाच्या पहिल्या सत्रात यजमान टीम इंडियाला (Team India) 329 धावांवर ऑलआऊट करत इंग्लंडने (England) दुपारच्या जेवणापर्यंत 4 विकेट गमावून 39 धावा केल्या आहेत. इशांत शर्मा, आर अश्विन (R Ashwin) आणि अक्षर पटेल यांनी डावाच्या सुरुवातीलाच इंग्लंड फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं व नियमित अंतराने 4 झटके दिले. दिवसाच्या पहिल्या सत्रात रोरी बर्न्स शून्यावर बाद झाला तर डोम सिब्ली 16 आणि जो रूट 6 धावा करून परतले. डॅन लॉरेन्सने 9 धावा केल्या. पहिल्या सत्राखेर बेन स्टोक्स (Ben Stokes) 8 धावा करून खेळत होता. अशास्थितीत, टीम इंडियाने पहिल्या डावात इंग्लंडविरुद्ध 290 धावांची आघाडी घेतली आहे. यापूर्वी दुसर्‍या दिवशी भारताचा पहिला डाव पहिल्या अर्ध्या तासाला संपला. दुसर्‍या दिवशी भारताने 6 बाद300 धावांपासून खेळण्यास सुरवात केली. (IND vs ENG 2nd Test: इतक्या धावांवर ऑलआऊट होणार इंग्लंड, महान फिरकीपटूने केली भविष्यवाणी)

पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला इशांतने पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का दिला. इंग्लंडच्या फलंदाजीतील पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर इशांतने बर्न्सला शून्यावर एलबीडबल्यू आऊट करत माघारी पाठवलं. यानंतर, स्पिनर अश्विनने इंग्लंडला दुसरा धक्का दिला आणि  कर्णधार विराट कोहलीच्या हाती डोम सिब्लीला कॅच आऊट केलं. सिब्लीने  16 धावा केल्या. टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने इंग्लंड कर्णधार जो रुटला बाद करत संघाला तिसरा झटका दिला आणि कसोटीमधील आपली पहिली विकेट मिळवली आहे. रुटने 6 धावा केल्या. दुसर्‍या दिवशी लंचपूर्वी अखेरच्या चेंडूवर अश्विनने डॅन लॉरेन्सला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. लॉरेन्सने 9 धावा केल्या आणि शुभमन गिलकडे झेलबाद केले.

यापूर्वी, टीम इंडियाकडून रोहित शर्माने 161, अजिंक्य रहाणेने 67 तर रिषभ पंतने नाबाद  58 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ओली स्टोनने 3 तसेच जॅक लीचने 2 फलंदाजांना माघारी धाडलं.