इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 2nd Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघादरम्यान चेन्नई (Chennai) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने (Shane Warne) एक मोठी भविष्यवाणी केली आहे. चेपॉक स्टेडियमवर सामन्याच्या पहिल्या डावात भारताविरुद्ध इंग्लंड संघ किती धावांवर ऑलआऊट होईल हे महान फिरकीपटू वॉर्नने सांगितले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये वॉर्नने म्हटलं की, दौऱ्यावरील संघ 157 धावाच करू शकेल. वॉर्नने ट्विट केले की, "माझा अंदाज आहे की चेन्नईत इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात आजच्या सामन्यात भारत 359 धावांवर ऑलआऊट होईल आणि चहापानानंतर फलंदाजीला परत येऊ शकेल, कारण इंग्लंड संघ 157 धावांवर ऑलआऊट होईल." चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 6 विकेट गमावून 300 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये रोहित शर्माने अर्ध्याहून अधिक धावा केल्या. (IND vs ENG 2nd Test 2021: रिषभ पंतचे दमदार अर्धशतक, टीम इंडियाचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला; मोईन अलीने घेतल्या सर्वाधिक विकेट्स)

पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात संघाने रोहित, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विनची विकेट गमावली. त्यापूर्वी, दिवसाच्या पहिल्या सत्रात यजमान टीम इंडियाने नियमित अंतरावर 3 विकेट गमावल्या. रोहितने 161, रहाणेने 67 आणि अश्विनने 15 धावा केल्या. चेन्नईच्या या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना पहिल्या दिवसापासून टर्न मिळू लागले. तर वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीवर फारशी मदत मिळाली नाही. सामन्याच्या पहिल्या दिवशी मोईन अली आणि जॅक लीच यांना प्रत्येकी 2 विकेट मिळवले, परंतु मोईन अलीची भारतीय फलंदाजांनी कसून धुलाई केली. भारताकडे फिरकी विभागातील आर अश्विन, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल तर वेगवान गोलंदाज म्हणून इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज आहेत. अशास्थितीत, इंग्लंड संघ फिरकीपटूंच्या या त्रिकुटाचा कसा सामना करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. शिवाय, या तीन फिरकी गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यास वॉर्नचा अंदाजही खरा ठरू शकतो.

दरम्यान, दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाचा पहिला डाव 329 धावनावर आटोपला. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ओली स्टोनने 3, जॅक लीचने 2 आणि कर्णधार जो रूटने एका फलंदाजाला माघारी पाठवलं.