IND vs ENG 2nd Test Day 2: लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा दबदबा; दिवसाखेर इंग्लंडची 119/3 धावांपर्यंत मजल, रूट अर्धशतका नजीक
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 2: भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडियाने (Team India) पहिल्या डावात 364 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात इंग्लंडने दिवसाचा खेळ संपला तेव्हा तीन विकेट्स गमावून 119 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे भारत अद्याप 245 धावांनी आघाडीवर आहे. ब्रिटिश संघाकडून कर्णधार जो रूट (Joe Root) 48 धावा करून खेळत होता तर रोरी बर्न्सचे (Rory Burns) अर्धशतक एका धावेने हुकले. बर्न्सने 136 चेंडूत 7 चौकारांसह 49 धावा केल्या. तसेच डोम सिब्ली 11 धावाच करू शकला तर रूटला साथ देत जॉनी बेअरस्टो दिवसाखेर 6 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, इंग्लंडविरुद्ध मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 2 विकेट्स काढल्या तर मोहम्मद शमीला 1 विकेट मिळाली. (IND vs ENG 2nd Test: बिचारा कोहली! इंग्लिश कर्णधारविरुद्ध Rishabh Pant ने विराटला DRS घेण्यासाठी ‘असे’ केले मना, मजेदार व्हिडिओ झाला व्हायरल)

भारतीय संघाचा डाव गुंडाळत दिवसाच्या दुसऱ्या सत्रात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडकडून बर्न्स आणि डॉमनिक सिब्लीने डावाची सुरुवात केली. दोंघांनी दुसरे सत्र संपेपर्यंत संयमी फलंदाजी करत विकेट जाऊ दिली नाही. मात्र, तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु होताच इंग्लंडला सलग दोन मोठे धक्के बसले. सिराजने डावातील 15व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर सिब्ली 11 धावांवर  पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला तर त्याच्या पुढच्याच चेंडूवर सराव सामन्यात शतक करणारा हसीब हमीदला सिराजने त्रिफळाचीत केले. त्यामुळे इंग्लडची अवस्था 15 षटकांत 24/2 धावा अशी झाली. पण नंतर कर्णधार रूट पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आला. दोघांनी 85 धावांची अर्धशतकी भागीदारी करून संघाला शंभरी धावसंख्या पार पोहचवले. अखेरीस बऱ्याच प्रतीक्षेनंतर शमीने अर्धशतकाच्या वाटेवर असलेल्या बर्न्सला पायचीत केलं.

लॉर्ड्स टेस्ट सामन्यात टीम इंडियाने 276/3 धावांपासून पुढे खेळण्यात सुरुवात केली होती. पहिल्या सत्राअखेर इंग्लिश गोलंदाजांनी लय पकडली आणि भारताने आणखी 88 धावा करून पहिल्या डावात 364 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलने 129 धावांची शतकी खेळी केली. तर रोहित शर्माने 83 धावांची शतकी खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने 42, अष्टपैलू रविंद्र जडेजाने 40 आणि रिषभ पंतने 37 धावांचे छोटेखानी पण महत्वपूण योगदान दिले. दुसरीकडे, इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.