IND vs ENG 2nd Test: चेतेश्वर पुजाराची विकेट इंग्लंड संघासाठी बनली आनंद आणि टेन्शनचे कारण, जाणून घ्या का
चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test 2021: लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील दुसरा कसोटी सामना रोचक वळणावर पोहचला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी बऱ्याच काळापासून टीकेला सामोरे जाणारे अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे अखेर लयीत परतले. दोघांनी शतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला व टीम इंडियाची आघाडी शंभरी पार पोहचवली. दुसऱ्या डावात 35 चेंडू खेळल्यानंतर पहिला धाव करणाऱ्या पुजाराने सामन्यात 206 चेंडू खेळत 45 धावांची खेळी केली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने (Mark Wood) संपुष्टात आणला. वूडने त्याला कर्णधार जो रूटच्या हाती शानदार चेंडूवर झेलबाद केले. या विकेटमुळे इंग्लंडमध्ये आनंद आणि तणाव दोन्ही आले आहेत. (IND vs ENG 2nd Test Day 4: अजिंक्य रहाणे-चेतेश्वर पुजारा जोडीचा शतकी संघर्ष, दिवसाखेर भारताची इंग्लंडवर 154 धावांची आघाडी)

झाले असे की लॉर्ड्सच्या दुसऱ्या डावात ज्या चेंडूवर पुजारा आऊट झाला, तो बघून खेळपट्टीचा अंदाज चांगलाच लावला जाऊ शकतो. इंग्लंडला अर्थातच आनंद आहे की त्यांना पुजाराकॉ मोठी विकेट मिळाली आणि रहाणेसोबतची त्यांची शतकी भागीदारी तुटली, पण त्यांना हे देखील चांगले माहित असेल की त्यांना या खेळपट्टीवर सामन्याच्या शेवटच्या डावात फलंदाजी करावी लागेल. जे अजिबात सोपे होणार नाही. रहाणे-पुजाराच्या संयमी भागीदारीने भारताची आघाडी आता 154 धावांवर नेली आहे. जर भारताने ही आघाडी 200 पार केली, तर इंग्लंडला सामन्याच्या शेवटच्या दिवशी हे लक्ष्य गाठणे सोपे होणार नाही. आता पंत एकमेव फलंदाज खेळपट्टीवर असल्यामुळे पाचव्या दिवशी त्याच्यावर संघाची आघाडी दोनशे पार नेण्याची मोठी जबाबदारी असेल ज्यांनंतर गोलंदाजांवर इंग्लिश फलंदाजांना बाद करून भारताच्या पारड्यात विजय टाकण्याची एक संधी मिळेल.

दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळ संपण्याच्या काही ओव्हरपूर्वी खराब प्रकाशामुळे खेळात व्यत्यय आला, त्यानंतर पंचांनी दिवसाचा खेळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत नाबाद 14 आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा 4 धावांवर नाबाद खेळत होते. मार्क वुड इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला असून त्याने आतापर्यंत तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याशिवाय फिरकीपटू मोईन अलीला दोन आणि एक विकेट सॅम कुरनला मिळाली. मोईन अलीने वैयक्तिक 61 धावसंख्येवर रहाणेला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रहाणेने आपल्या अर्धशतकी खेळीत 146 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकार खेचले.