अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 4: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित संपुष्टात आला आहे. लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) शतकी भागीदारीच्या बळावर 181/6 धावा केल्या आणि ब्रिटिश संघावर टीमला दुसऱ्या डावात 154 धावांची आघाडी मिळवून दिली आहे. रहाणेने 146 चेंडूत 61 धावा केल्या तर पुजाराने 206 चेंडूत 45 धावा करून त्याला साथ दिली. चौथ्या दिवसाखेर रिषभ पंत 14 धावा व इशांत शर्मा 4 धावा करून खेळत होते. दिवसाच्या सुरुवातीला तीन विकेट्स गमावल्यावर पुजारा-रहाणेने शतकी भागीदारी करत पहिले आणि दुसरे अर्धे सत्र खेळून काढले आणि संघाचा डाव सावरला. इंग्लिश वेगवान गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) 3 तर मोईन अली 2 आणि सॅम कुरन दिवसाखेर 1 विकेट घेण्यात यशस्वी ठरले. (IND vs ENG 2nd Test: विराट कोहलीने गेल्या ‘इतक्या’ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये झळकावले नाही एकही शतक, लॉर्ड्स टेस्टमधेही झाला फ्लॉप)

चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने 3 महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. दिवसाच्या सुरुवातीला एकेवेळी टीम इंडियाची स्थिती 55/3 अशी झाली होती पण नंतर रहाणे आणि पुजाराने भारताचा डाव सावरला. पुजाराने एका बाजूने सावध खेळ केला, तर दुसऱ्या बाजूने रहाणेने त्याला संयमी साथ दिली. त्यामुळे दोघांनी दिवसाखेर नाबाद शतकी भागीदारी केली. दोघे कसोटी तज्ञ फलंदाजांनी संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि संघाची आघाडी शंभरी पार नेली. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडचा पहिला डाव 391 धावांवर आटोपला होता त्यामुळे चौथ्या दिवशी रोहित शर्मा-केएल राहुलची सलामी जोडी मैदानात उतरली. दोघांनी सावध सुरुवात केली. तथापि 10 व्या ओव्हरमध्ये वूडने पहिल्या डावातील शतकवीर राहुलला स्वस्तात परतीचा रस्ता दाखवला. राहुल दुसऱ्या डावात 30 चेंडूत 5 धावाच करू शकला.

त्यानंतर रोहितला साथ देण्यासाठी पुजारा मैदानात उतरला पण ही जोडीही फार काळ टीकू शकली नाही. वूडने टाकलेल्या 12 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात रोहित डीप स्क्वेअर लीगला मोईन अलीकडे झेलबाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर विराट-पुजाराने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विराटने काही चांगले फटकेही खेळले. मात्र, पुन्हा तो चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कुरनने त्याला बटलरकडे झेल केले. दुसरीकडे, यापूर्वी इंग्लंडने पहिल्या डावात भारताच्या 364 धावसंख्येचा प्रत्युत्तरात 391 धावांपर्यंत मजल मारली आणि 27 धावांची आघाडी घेतली होती.