IND vs ENG 2nd Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात आज दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने दणदणीत विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे, मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी यजमान टीम इंडियाला सामना जिंकणे गरजेचे आहे, तर दुसरीकडे, इंग्लंड संघ सामना जिंकून विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. अशास्थितीत, दोन्ही संघाने मजबूत प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. भारताकडून अक्षर पटेलने (Axar patel) कसोटी पदार्पण केलं असून अखेर कुलदीप यादवला संधी मिळाली आहे आणि जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती दिली असून त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश झाला आहे. (IND vs ENG 2nd Test Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील दुसरी टेस्ट कुठे, कधी आणि कसे पाहणार?)
चेन्नई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताने फलंदाजी क्रमवारीत कोणताही बदल केलेला नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी पुन्हा एकदा सलामीला येईल. चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. अष्टपैलू म्हणून आर अश्विन, अक्षर पटेल यांना संघात स्थान मिळाले असून कुलदीप यादव त्यांच्यासह फिरकी गोलंदाजी विभाग सांभाळेल. मोहम्मद सिराज, ईशांत शर्मा वेगवान गोलंदाजी विभाग सांभाळतील. दुसरीकडे, इंग्लंडने मागील प्लेइंग इलेव्हनमधून जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन, जोस बटलर आणि डॉम बेस यांना बाहेर करत स्टुअर्ट ब्रॉड, बेन फोक्स, क्रिस वोक्स आणि ऑली स्टोन यांचा समावेश झाला आहे.
असा आहे भारत-इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि ईशांत शर्मा.
इंग्लंड: रोरी बर्न्स, डॉम सिब्ली, डॅन लॉरेन्स, जो रूट (कॅप्टन), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच आणि ओली स्टोन.