IND vs ENG 2nd T20I 2021: नवोदित Ishan Kishan, विराट कोहली यांचा अर्धशतकी तडाखा, टीम इंडियाची मालिकेत 1-1ने बरोबरी
ईशान किशन आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd T20I 2021: नवोदित ईशान किशन (Ishan Kishan) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने (Indian Team) इंग्लंड (England) संघाविरुद्ध अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवरील (Motera Stadium) दुसऱ्या टी-20 सामन्यात दणक्यात कमबॅक करत 7 विकेटने विजय मिळवला. भारताकडून आजच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पण करणाऱ्या ईशानने 32 चेंडूत 56 धावा केल्या तर कॅप्टन कोहलीने पुढाकार घेत बॅटने संघाचे नेतृत्व करत सर्वाधिक नाबाद 73 धावा ठोकल्या. रिषभ पंतने 26 धावांचे योगदान दिले तर श्रेयस अय्यर 8 धावा करून नाबाद परतला. या सामन्यात विजयासह टीम इंडियाने (Team India) 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दुसरीकडे, इंग्लंडचे गोलंदाज आज असहाय्य दिसले आणि भारतीय फलंदाजांना त्यांची चांगली धुलाई केली. सॅम कुरन, क्रिस जॉर्डन आणि आदिल रशीद यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाल्या. (IND vs ENG 2nd T20I 2021: अंपायरशी मतभेदावर Virat Kohli याने स्टम्पवर काढली भडास, इंग्लंडला झाला फायदा, नक्की काय घडले पहा)

इंग्लंड संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये दिलेल्या 165 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने अवघ्या ओव्हरमध्ये विजयीरेष ओलांडली. इंग्लिश संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची वाईट सुरुवात झाली. भारताने शून्यावर पहिली विकेट गमावली. ओपनर केएल राहुलचे संघर्ष सुरूच राहिले आणि तो भोपळा न फोडता माघारी परतला. राहुल बाद झाल्यावर विराट आणि इशांतने इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. दोंघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान, कोहली आणि ईशानला जीवनदान मिळाले. पहिले जॉर्डनच्या गोलंदाजीवर विकेटकीपर जोस बटलरने विराट 10 धावांवर खेळताना कॅच सोडला. त्यानंतर, किशनला 41 धावांवर जीवनदान मिळालं. सामन्यातील रशीदच्या 8व्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर ईशानने फटका लगावला जो थेट बेन स्टोक्सच्या हातात जाऊन बसला. पण स्टोक्सला झेल नीट पकडता आला नाही परिणामी चेंडू त्याच्या हातातून सटकला आणि ईशानला जीवनदान मिळालं.

यानंतर संधीचा फायदा घेत किशनने सलग 2 चेंडूत सिक्सर खेचत पदार्पणातील सामन्यात अर्धशतक झळकावलं, पण अर्धशतक पूर्ण होताच ईशान माघारी परतला. इशानने 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. रिषभ पंतनेही इंग्लंड गोलंदाजांची धुलाई केली आणि मोठे फटके खेळले पण आणखी एक शॉट खेळण्याच्या प्रयत्नात जॉनी बेररस्टोच्या हाती झेलबाद झाला. अखेर कोहलीने षटकार खेचत 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि संघाला आवश्यक असा विजय मिळवून दिला.