IND vs ENG 1st ODI 2021: शिखर धवन नर्व्हस नाईंटीचा शिकार, विराट-कृणाल-राहुलचा अर्धशतकी तडाखा; इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे लक्ष्य
शिखर धवन आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st ODI 2021: पुणे (Pune) येथील गहुंजे स्टेडियमवर सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून317  धावा केल्या आणि इंग्लंडला (England) विजयासाठी 318 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियासाठी शिखर धवन (Shikhar Dhawan), कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल आणि कृणाल पांड्याने (Krunal Pandya) अर्धशतकी खेळी केली. यांनतर, राहुल आणि कृणालच्या शतकी भागीदारीने संघाला तीनशे पार मजल मारून दिली.  धवनने सर्वाधिक 98 धावा केल्या तर विराटने 56 आणि रोहित शर्माने 28 धावांचे योगदान दिले. केएल राहुल 62 धावा आणि पदार्पणवीर कृणाल पांड्या 588धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, विराट-धवनने इंग्लंड गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि राहुल-कृणालने संघाला तीनशे पार मजल मारून दिली. इंग्लंडसाठी बेन स्टोक्सने 3 तर मार्क वूडला 2 विकेट मिळाल्या. (IND vs ENG 1st ODI 2021: हार्दिक आणि क्रुणाल पांड्या 9 वर्षानंतर टीम इंडियात एकत्र खेळणारे ठरले पहिले बंधू, ‘या’ भावंडांची होती अखेरची जोडी)

मालिकेच्या पहिल्या सामन्यात टॉस गमावून फलंदाजी करत टीम इंडियाने सावध सुरुवात केली आणि पहिल्या 10 ओव्हरमध्ये बिनबाद 39 धावा केल्या. रोहित आणि धवनच्या जोडीने अर्धशतकी सलामी भागीदारी केली आणि संघाला आश्वासक सुरुवात मिळवून दिली, पण स्टोक्सने डावाच्या 15व्या ओव्हरमध्ये संघाला पहिला धक्का दिला. स्टोक्सने रोहितला विकेटकीपरच्या हाती कॅच आऊट केलं. यानंतर, धवन आणि विराटने संघाचा डाव सावरला. धवनने षटकार खेचत कारकिर्दीतील 31वे अर्धशतक पूर्ण केलं. शिखर पाठोपाठ कोहलीने 50 चेंडूत 100च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. धवन आणि विराटने फटकेबाजी करत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दरम्यान, एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कोहली आऊट झाला. विराटनंतर श्रेयस देखील फटकेबाजी करण्याच्या नादात कॅच आऊट झाला. श्रेयसने 6 धावा केल्या.

यानंतर, धवनच्या रूपात संघाला मोठा धक्का बसला. धवन नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला आणि अवघ्या 2 धावांनी त्याचं शतक हुकलं. स्टोक्सने हार्दिकला बाद करत संघाला पाचवा झटका दिला. विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्ध आजच्या सामन्यातून कृणालने वनडे तर प्रसिद्ध कृष्णाने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.