IND vs AUS, U19 World Cup 2022: वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) अंतिम सामन्यात धडक मारली आहे. अँटिग्वा (Antigua) येथील कुलीज क्रिकेट मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा (Australia) 96 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने (Indian Team) 50 षटकांत 5 गडी गमावून 290 धावा केल्या. सुरुवातीच्या दोन झटक्यांनंतर कर्णधार यश धुल (Yash Dhull) आणि उपकर्णधार शेख राशिदने (Shaik Rasheed) द्विशतकी भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. यश धुलने सर्वाधिक 110 धावा केल्या. उपकर्णधार रशीदने 94 धावांची खेळी खेळली. यश धुल आणि उपकर्णधार शेख रशीद यांनी 204 धावांची भागीदारी करून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर 5 बाद 290 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 41.5 षटकांत सर्वबाद 194 धावांत आटोपला.
अंतिम फेरीत भारताचा सामना 1998 च्या चॅम्पियन इंग्लंडशी होईल. हा सामना 5 फेब्रुवारी रोजी सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. या विजयासह चार वेळचा अंडर-19 चॅम्पियन भारतीय संघ सलग चौथ्यांदा आणि विक्रमी आठव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंडर-19 विश्वचषकात सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. टीम इंडियाने 2000, 2006, 2008, 2012, 2016, 2018, 2020 आणि या वर्षी अंतिम फेरी गाठली आहे. तर भारताने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये विश्वचषक जिंकला होता. याशिवाय 2006, 2016 आणि 2020 मध्ये अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या भारताला स्पर्धेच्या प्रारंभीच कोविड-19 चा फटका बसला आणि दोन सामन्यांसाठी धुल व रशीद या खेळाडूंना बाहेर बसावे लागले. परंतु संघातील सखोलतेमुळे त्यांनी बाद फेरीपर्यंत मजल मारली.
India become the first team in #U19CWC history to qualify for four consecutive finals 👏 pic.twitter.com/KNVU6tEPKT
— ICC (@ICC) February 2, 2022
सामन्याबद्दल बोलायचे तर फलंदाजीला उतरलेला ऑस्ट्रेलियन संघाने नियमित अंतराने विकेट गमावल्या. संपूर्ण सामन्यात भारताच्या युवा खेळाडूंचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. ऑस्ट्रेलियाकडून लचलान शॉने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर विकी ओस्तवालने भारतीय संघाच्या गोलंदाजीची कमान सांभाळली आणि ऑस्ट्रेलियन संघातील तीन बड्या खेळाडूंना त्याने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यापूर्वी भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार यश धुलने कर्णधाराला साजेशी खेळी केली आणि 110 चेंडूत 10 चौकार व एका षटकारासह 110 धावा केल्या. अंडर-19 विश्वचषकात शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीने 2008 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध, तर उन्मुक्त चंदने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 111 धावांची शतकी खेळी केली होती.