IND vs PAK (Photo Credit - Twitter)

IND vs PAK CWC 2023 Semi Final: एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) मध्ये भारतीय संघाची (Team India) जोरदार मोहीम सुरू आहे. सलग 8 विजयांसह भारतीय संघाने आधीच उपांत्य फेरी गाठली असून गुणतालिकेत ते पहिल्या स्थानावर विराजमान आहे. रविवारी (5 नोव्हेंबर) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव (India Beat South Africa) केला. आता चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कोणाचा सामना करू शकते? वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा सामना होऊ शकतो का? (हे देखील वाचा: IND vs SA सामन्यात लाइव्ह स्ट्रीमिंगचा रचला गेला नवा विक्रम, Disney+Hotstar वर 4.4 कोटी चाहत्यांनी घेतला सामन्याचा आनंद)

टीम इंडिया 15 नोव्हेंबरला खेळणार सेमीफायनल

आयसीसी विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीत, गुणतालिकेतील अव्वल संघ आणि चौथा संघ यांच्यात वानखेडे, मुंबई येथे सामना होणार आहे. गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर कायम राहण्याची खात्री आहे. याचा अर्थ आता भारताचा सामना चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी होणार आहे. सध्या भारताशिवाय फक्त दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे. सध्या उपांत्य फेरीतील तिसऱ्या आणि चौथ्या संघांसाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत चौथ्या स्थानासाठी खरी स्पर्धा न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आहे. या दोन्ही संघांचे सध्या 8-8 गुण आहेत. मात्र, नेट रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंड पाकिस्तानच्या पुढे आहे. न्यूझीलंडला 9 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे, तर पाकिस्तान 11 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे.

उपांत्य फेरीत भारत - पाकिस्तानमध्ये होऊ शकतो महामुकाबला?

जर न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सामना हरला आणि पाकिस्तानने आपल्या शेवटच्या गट सामन्यात इंग्लंडचा पराभव केला, तर पाकिस्तानचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खुला होईल. तसेच न्यूझीलंडचा श्रीलंकेसोबतचा सामना वाहून गेला तरी त्याचा फायदा होईल. म्हणजेच न्यूझीलंड हरला किंवा पावसामुळे सामना रद्द झाला आणि पाकिस्तानने इंग्लंडला हरवले तर पाकिस्तान उपांत्य फेरीतील चौथा संघ म्हणून जागा निश्चित करू शकतो. असे झाल्यास 15 नोव्हेंबरला विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना निश्चित होईल.

अफगाणिस्तानही उपांत्य फेरीच्या शर्यतीत 

अफगाणिस्तान संघही 7 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. मात्र यासाठी अफगाणिस्तानला आपल्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागेल, जे अजिबात सोपे नाही. मात्र अफगाणिस्तान हे करू शकला तर न्यूझीलंड आणि पाकिस्तानला पराभूत करून उपांत्य फेरी गाठेल. अफगाणिस्तान संघाने या विश्वचषकात इंग्लंड, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव करून 3 अपसेट केले आहेत.