एलिसा हिली (Photo Credit: Twitter/ICC)

ICC Women's World Cup 2022: ऑस्ट्रेलियाने (Australia) सातव्यांदा आयसीसी महिला वनडे विश्वचषक (Women's ODI World Cup) काबीज केला आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी सामन्यात इंग्लंडचा (England) 71 धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 356 धावा केल्या. सलामीवीर एलिसा हिली (Alyssa Healy) हिने 138 चेंडूत कारकिर्दीतील सर्वोत्तम 170 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली हिने इंग्लंडविरुद्ध महिला विश्वचषक फायनल सामन्यात इतिहास रचला आहे. न्यूझीलंडमध्ये या प्रतिष्ठेच्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एलिसाने 138 चेंडूत विक्रमी 170 धावा ठोकल्या. (Australia 7th World Cup: ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 71 धावांनी पराभव करत 7 व्यांदा जिंकला विश्वचषक)

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने हेली हिची शतकी खेळी आणि सलामीवीर रॅचेल हेन्स हिच्या 68 धावांच्या जोरावर इंग्लंडसमोर 357 धावांचे डोंगर उभे केले. ऑस्ट्रेलियन संघ सातव्यांदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरला. एलिसा हिली विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत 500 हून अधिक धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. महिला वनडे फायनल सामन्यात खेळलेली ही सर्वात मोठी खेळी आहे. यापूर्वी हा विक्रम भारताच्या मिताली राज हिच्या नावावर होता. मितालीने 2006 आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 108 धावांची खेळी केली होती. तसेच ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट याच्या नावावर आयसीसी स्पर्धेत सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम होता. 2007 विश्वचषक फायनलमध्ये त्याने गिलख्रिस्टने श्रीलंकेविरुद्ध 149 धावा तर रिकी पाँटिंगने 2003 मध्ये भारताविरुद्ध 140 धावा केल्या होत्या. अशा परिस्थतीत आता या दोघांना मागे टाकून, हीली यादीत नांबे एक खेळाडू ठरली आहे.

याशिवाय हिलीने या स्पर्धेत 509 धावा चोपल्या, ज्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील एक विश्वविक्रम आहे. हीली 170 धावांची इनिंग खेळल्यानंतर यष्टीचीत झाली. इथेही तिने एक विक्रम केला. महिला वनडेत सर्वात मोठी खेळी खेळून यष्टीचीत होणारी ती फलंदाज बनली आहे. तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्स हीच विक्रम मोडला जी 151 धावा करून यष्टिचीत झाली. हिलीने आपल्या विक्रमी खेळीत 26 चौकार मारले. महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये तीन फलंदाजांनी एका डावात जास्त चौकार मारले आहेत. मात्र विश्वचषकात ही कामगिरी कोणालाही करता आलेली नाही. पुरुष एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्माने 34 चौकार आणि महिलांच्या एकदिवसीय सामन्यात अमेलिया केर हिने 31 चौकार लगावले आहेत. विश्वचषकाच्या एका डावात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम हीलीच्या नावे झाला आहे.