ICC Test Team Rankings: इंग्लंडला धूळ चारत टीम इंडियाचा टेस्ट टीम क्रमवारीत जलवा, न्यूझीलंडकडून मुकुट काढून घेत पुन्हा बनली नंबर वन
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: PTI)

ICC Test Team Rankings: इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने (India) तिसऱ्या दिवशीच 3-1 असा मालिकेवर शिक्कामोर्तब केला आणि त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. आता अंतिम फेरीत भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सामना होणार असून जूनमध्ये WTC च्या उद्घाटन आवृत्तीच्या विजेतेपदाचा निर्णय होईल. शिवाय, कसोटी सामन्यात भारताने घरच्या मैदानावरील आपली विजयी घोडदौड सुरु ठेवत सलग 13वी मालिका खिशात घातली. या मालिकेच्या विजयासह विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाने न्यूझीलंडला अव्वल स्थानावरून खाली ढकलत पुन्हा एकदा आयसीसी कसोटी संघ क्रमवारीत (Test Team Rankings) नंबर एकचा मान मिळवला. घरच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी करत न्यूझीलंडने 118 गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून मालिकेत चमकदार विजयानंतर भारताचे आता 122 गुण झाले आहेत. (ICC World Test Championship Final 2021: टीम इंडियाची लॉर्ड्स वारी, ऑस्ट्रेलियाचं स्वप्न चक्काचूर करत मिळालं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट)

यापूर्वी, फेब्रुवारी 2020 मध्ये न्यूझीलंडने 2-0 अशा फरकाने भारताला पराभूत करत पहिल्या क्रमांकाचा मुकुट काढून घेतला होता. इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारत आणि न्यूझीलंडचे समान 118 गुण होते परंतु मालिका जिंकत टीम इंडियाने पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, 3-1 अशा पराभवनानंतरही इंग्लंड संघाच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, मालिकेत सलग तीन कसोटी सामने गमावल्यानंतर इंग्लंड चौथ्या स्थानावर घसरला आहे. भारताविरुद्ध मालिका पराभवानंतर इंग्लंडचे गुण 105 झाले आहेत. शिवाय, इंग्लंडचे कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया 113 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे.

दुसरीकडे, इंग्लंडने चेन्नई येथे पहिल्या सामन्यात 227 धावांनी विजयासह मालिकेची सुरुवात केली, पण भारतीय संघाने उर्वरित तीन सामन्यात दबदबा कायम ठेवत इंग्लिश संघाला वरचढ होऊ दिले नाही. शिवाय, दोन्ही संघातील तिसरा पिंक-बॉल कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपुष्टात आला होता ज्यात यजमान संघाने 10 विकेटने इंग्लंडचा धुव्वा उडवला. इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर आता दोन्ही संघात 12 मार्चपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार असून सर्व सामने अहमदाबादमध्ये खेळले जाणार आहेत. इंग्लंड दौर्‍याची सांगता तीन वनडे सामन्याने होईल आणि त्यानंतर इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 14वा हंगाम खेळला जाईल.