
India Natioan Cricket Team vs England National Cricke Team: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका (IND vs ENG 1st Test 2025) 20 जूनपासून सुरू झाली असून, लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला 5 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2जुलैपासून एजबॅस्टन (Edgbaston) येथे रंगणार आहे. वर्कलोड मॅनेजमेंटच्या पार्श्वभूमीवर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुसऱ्या कसोटीतून विश्रांती दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर बुमराह खेळला नाही, तर भारताचे गोलंदाजी आक्रमण कसे असेल, हा मोठा प्रश्न आहे.
सिराजवर येणार जबाबदारी
बुमराह अनुपस्थित राहिल्यास मोहम्मद सिराज भारतीय आक्रमणाचे नेतृत्व करेल. कसोटी क्रिकेटमध्ये 37 सामन्यांत 102 बळी घेतलेल्या सिराजकडे अनुभव आहे. प्रसिद्ध कृष्णा पहिल्या कसोटीत महागडा ठरला असला तरी त्याने महत्त्वाच्या क्षणी 5 बळी घेतले आणि त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यातही अंतिम 11 मध्ये स्थान मिळवू शकतो. (हे देखील वाचा: ENG Announces Squad for IND vs ENG 2nd Test 2025: इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी संघाची केली घोषणा, जोफ्रा आर्चरची पुनरागमन; 'या' 15 खेळाडूंना मिळाली संधी)
बुमराहची जागा कोण घेणार?
बुमराहच्या अनुपस्थितीत टीम मॅनेजमेंटकडे दोन प्रमुख पर्याय आहेत – अर्शदीप सिंग आणि आकाशदीप. अर्शदीपने अजून कसोटी पदार्पण केलेले नाही, पण इंग्लंडमधील स्विंगसाठी उपयुक्त परिस्थितीत तो प्रभावी ठरू शकतो. दुसरीकडे, आकाशदीपने भारतासाठी 7 कसोटींमध्ये 15 बळी घेतले आहेत आणि त्यानेही नेट्समध्ये चांगली तयारी केली आहे.
स्पिन विभागात कोणाला संधी?
पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजा अपेक्षेप्रमाणे प्रभाव टाकू शकला नाही, पण त्याचा अनुभव आणि फलंदाजीतले योगदान पाहता, त्याला संघातून वगळण्याची शक्यता कमी आहे. शार्दुल ठाकूरऐवजी कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते, जो मुख्य फिरकी गोलंदाज आणि चौथा गोलंदाज म्हणून भूमिका पार पाडू शकतो. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारत कोणत्या गोलंदाजांवर विश्वास ठेवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुमराहशिवाय भारतीय आक्रमण किती प्रभावी ठरेल, हे पाहणे रंजक ठरेल.
संभाव्य गोलंदाजी आक्रमण:
मोहम्मद सिराज
प्रसिद्ध कृष्णा
आकाशदीप / अर्शदीप सिंग
रवींद्र जडेजा
कुलदीप यादव